निर्मनुष्य बेटावर एकांतवासातली ३२ वर्षे; एका अवलियाचा चित्तथरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 10:15 AM2021-10-04T10:15:23+5:302021-10-04T10:15:45+5:30
असाच एक अवलिया म्हणजे इटलीचे माउरो मोरांडी. त्यांनीही इटलीच्या एका सुनसान बेटावर एकट्यानं तब्बल ३२ वर्षे काढली, या बेटाची सर्वतोपरी काळजी घेतली आणि आता वयाच्या ८२ व्या वर्षी ते पुन्हा शहरात राहण्यासाठी परतले आहेत.
आसामच्या जोरहाट परिसरात राहणारे ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ जादव पायेंग आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. ब्रह्मपुत्रा नदीच्या उजाड, वाळवंटी बेटावर त्यांनी नंदनवन फुलविलं. जिथे अक्षरश: रेती आणि मातीशिवाय काहीही नव्हतं, इतर काही उगवत नव्हतं, अशा ठिकाणी त्यांनी एकहाती जंगल उभारलं. तब्बल तीस वर्षे एकट्यानं, महाकष्टानं ‘मुलाई’चं हे जंगल उभारलं. त्यासाठी जे जे करता येईल ते ते केलं. या जंगलात आता वाघ, सिंह, हत्तींपासून अनेक वन्य प्राणी राहतात आणि अनेक दुर्मीळ वनस्पतींनीही हे जंगल संपन्न आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा जो काही महापराक्रम केला, तो संपूर्णपणे अज्ञात राहून. एका वाळवंटावर त्यांनी जंगल उभारलं, हे ना बाहेरच्या जगाला माहीत होतं, ना वनाधिकाऱ्यांना, ना सरकारला. एका पत्रकाराच्या चौकस नजरेमुळे ही घटना उघडकीस आली आणि त्यानंतर अल्पावधीत संपूर्ण जगाला माहीतही झाली. त्यांच्या या कार्यामुळे नंतर भारत सरकारनं त्यांना ‘पद्मश्री’ या बहुमानानं सन्मानितही केलं..
असाच एक अवलिया म्हणजे इटलीचे माउरो मोरांडी. त्यांनीही इटलीच्या एका सुनसान बेटावर एकट्यानं तब्बल ३२ वर्षे काढली, या बेटाची सर्वतोपरी काळजी घेतली आणि आता वयाच्या ८२ व्या वर्षी ते पुन्हा शहरात राहण्यासाठी परतले आहेत. अर्थात त्यांचं शहरात राहायला येणं हा नाइलाज होता. इच्छा नसतानाही त्यांना आपलं बेट सोडून बेटाजवळच्या शहरात एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी यावं लागलं. त्यांच्या प्रवासाची कथाही मोठी चित्तथरारक आहे. कोणत्याही माणसाला एखाद्या निर्जन जागी सोडलं, तर काही दिवसांतच त्याला कंटाळा येईल, माणसांत येण्याची ओढ लागेल, पण माउरो यांनी मुळातचं हे बेट गाठलं, ते शहरी धावपळ, दगदग, प्रदूषण आणि सिमेंटच्या जंगलाला कंटाळून. ते शिक्षक होते. त्यांना एकांत हवा होता, निसर्गाच्या सान्निध्यातच कायमचं राहायचं होतं.
मोरांडी यांचं म्हणणं आहे, इटलीत सुरू झालेला उपभोगवाद आणि राजकीय परिस्थितीला कंटाळून मी कुठे तरी दूर, एखाद्या बेटावर जायचं ठरवलं. निसर्गाच्या सान्निध्यात मला नवं आयुष्य सुरू करायचं होतं. सर्व प्रकारच्या नागरी सुविधांपासून दूर असलेल्या पोलिनेशिया येथील ‘ला मॅडलेना’च्या द्वीपसमूहातील एखाद्या बेटावर त्यांना जायचं होतं. त्यांनी जहाजाद्वारे आपला प्रवास सुरू केला, त्यावेळी आणखीही काही लोक त्यांच्याबरोबर होते. तिथेच राहून व्यवसाय आणि नवं आयुष्य सुरू करावं असं सगळ्यांना वाटत होतं, पण बुडेली या बेटावर पोहोचल्यावर इथेच आपण राहावं असं मोरांडी यांना वाटायला लागलं. कारण हे बेट निर्मनुष्य तर होतंच, पण ते अतिशय सुंदरही होतं. शिवाय या बेटावर राहणारा एकमेव ‘केअरटेकर’ही आता वृद्ध झाला होता. बेटाची जबाबदारी एकट्यानं सांभाळणं त्याला शक्य नव्हतं, म्हणून मोरांडी यांनी ही जबाबदारी घेतली आणि एकट्यानं तिथं राहायला सुरुवात केली.
मोरांडी तिथे राहायला आले, तरी त्यांच्यामागच्या अडचणी संपल्या नाहीत. त्यांना तिथून ‘हाकलण्याचे’ प्रयत्न झाले, त्यांच्या हत्येचाही प्रयत्न झाला, पण काहीही झालं तरी या बेटावरच राहण्याचा आणि बेटाचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ज्या जहाजाद्वारे ते या बेटापर्यंत पोहोचले होते, ते जहाज या बेटाजवळ आल्यानंतर मोडलं. त्यामुळे ते या बेटावर उतरले. इथलं निसर्गरम्य वातावरण पाहून इथेच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे यथावकाश ही बातमी सर्वदूर पसरली आणि लोकांचं लक्ष्य या वेड्या इसमाकडे वळलं. शंका घेतल्या जाऊ लागल्या. आरोप सुरू झाले. या बेटावर ज्या झोपडीत ते राहत होते, त्यात त्यांनी अवैध रीतीनं बदल केले, काही सुधारणा केल्या असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला. ज्या झोपडीत ते राहत होते, ती झोपडी म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘रेडिओ स्टेशन’ होतं असं म्हटलं जातं.
या बेटाला अभयारण्य बनविण्यासाठी इटली सरकारही प्रयत्नशील होतं. मोरांडी ‘अवैध’ रीतीनं इथे राहत असल्याचं कारण सांगून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. न्यायालयानंही निकाल दिला की हे बेट ला मॅडालेना नॅशनल पार्कच्या मालकीचं आहे. खरंतर इतकी वर्षे मोरांडी एकट्यानं या बेटाची देखभाल करीत होते. हे बेट ना बळकावण्याचा त्यांचा विचार होता, ना त्यापासून काही आर्थिक फायदा त्यांना करून घ्यायचा होता. उलट त्यांनीच हे बेट जिवंत ठेवलं, त्यांना उगाच त्रास दिला गेला, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे.
‘बेट हेच माझं घर’!
मोरांडी यांना बेटावरून काढण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी स्वत:च हे बेट सोडलं आणि बेटाजवळच्या गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. ते म्हणतात, हे ‘माझं घर’ नाही, बेट हेच माझं घर आहे, पण तिथून मी आता परतलो असलो, तरी माझ्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही. हे बेट आणि हा समुद्र मरतानाही माझ्या डोळ्यांसमोरून हलणार नाही.. कारण सकाळी डोळे उघडल्यावर तेच मला समोर दिसतं!