36 इंचाचा वर आणि 34 इंचाची वधू; अनोखे लग्न पाहण्यासाठी निमंत्रणाशिवाय जमले हजारो लोक...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 03:46 PM2022-05-04T15:46:51+5:302022-05-04T15:50:02+5:30
बिहारच्या भागलपूरमधील एका लग्नाची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. या दाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.
भागलपूर: असे म्हटले जाते की, जोड्या स्वर्गात देव तयार करतो. बिहारमधील भागलपूरमध्ये अशाच एका जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अनोख्या लग्नाला हजारो पाहुणे निमंत्रणाशिवाय आले. एवढेच नाही तर लोकांनी वधू-वरांसोबत सेल्फी काढले आणि दोघांना यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. हे लग्न खूप खास होते कारण वराची उंची 36 इंच आणि वधूची 34 इंच आहे. संपूर्ण परिसरात लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
24 वर्षीय वधू ममता ही नवगचिया येथील किशोरी मंडस उर्फ गुजो मंडलची मुलगी आहे. मसारू येथील बिंदेश्वरी मंडलचा मुलगा मुन्ना भारती हा 26 वर्षांचा आहे. वधू-वर हे भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. खरं तर हे लग्न खूप खास ठरले कारण 36 इंची मुन्नाला त्याचा जीवनसाथी मिळाला. 34 इंची ममतासोबत मुन्नाची जोडी आकर्षक दिसत होती. यावेळी उपस्थित प्रत्येकजण या जोडीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता.
लग्नाच्या वेळी डीजेवर 'रब ने बना दी जोडी' हे गाणे वाजत होते आणि लोक त्यावर जोरदार नाचत होते. या लग्नाला हजारो स्थानिक लोक पोहोचले होते. जयमालाच्या वेळी लोकांची स्टेजपर्यंत जाण्यासाठी चढाओढ सुरू होती. हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.