थ्री डी प्रिंटिंगने वाचले नवजात बाळाचे प्राण ! अचूक निदानासाठी प्रथमच वापर
By admin | Published: October 20, 2015 04:09 AM2015-10-20T04:09:36+5:302015-10-20T04:09:36+5:30
नव्याने विकसित झालेल्या ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच वापर करून एका नवजात बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
वॉशिंग्टन : नव्याने विकसित झालेल्या ३डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच वापर करून एका नवजात बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
मेगन थॉम्पसन या ३० आठवड्यांच्या गरोदर महिलेची डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड तपासणी केली तेव्हा तिच्या पोटातील बाळाच्या लहान्या चेहऱ्यावर अंदाजे अक्रोडाच्या आकाराचा एक मांसाचा गोळा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यामुळे जन्माला आल्यावर कदाचित त्या बाळाला श्वासही घेता येणार नाही, अशी भीतीची पाल डॉक्टरांच्या मनात चुकचुकली.
तज्ज्ञांचे मत घेण्यासाठी मेगन थॉम्पसनला मिशिगन विद्यापीठाच्या सी. एस. मॉट लहान मुलांच्या इस्पितळात पाठविले गेले. तेथील डॉक्टरांना याचा निर्णय घ्यायचा होता की, बाळाच्या जीवाला कोणताही धोका न पोहोचता मेगनची प्रसूती नेहमीच्या सिझेरियन शस्त्रक्रियेने करता येईल की त्यासाठी अधिक विरळा व जीवरक्षक अशी गुंतागुंतीची प्रक्रिया करावी लागेल. यासाठी पोटातील बाळाच्या चेहऱ्यावर असलेल्या मांसाच्या गोळयाचे स्वरूप नेमके काय आहे याचे नेमके निदान होणे गरजेचे होते. त्यासाठी डॉक्टरांनी ३ डी प्रिंटिंग तंत्राचा आधार घेतला.
इस्पितळाचे बालरोग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक ग्लेन ग्रीन म्हणाले की, पोटातील बाळाचा श्वसनमार्ग अवरुद्ध होण्याचा धोका किती आहे याचे नेमके निदान प्रसूतीआधीच करण्यासाठी ३ डी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाण्याची माझ्या माहितीप्रमाणे वैद्यकविश्वातील ही पहिलीच वेळ आहे. मूल जन्माला येण्याआधीच त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकेल अशी गुंतागुंतीची परिस्थिती हाताळण्यासाठी बविष्यात ३ डी प्रिंटिंग हे एक बहुमोल साधन ठरू शकेल.
डॉ. ग्रीन म्हणाले की, प्रचलित अल्ट्रासाऊंड तंत्राने पोटातील गर्भाची जी चित्रे आम्हाला उपलब्ध झाली त्यावरून बाळ जन्माला आल्यावर चेहऱ्यावरील त्या मांसाच्या गोळयाने त्याचा श्वास बंद होण्याचा धोका आहे का व असेल तर किती आहे, याचा नेमका अंदाज आम्हाला येत नव्हता. परंतु ३ डी चित्रांमुळे आम्हाला चेहऱ्यावरील तो मांसाचा गोळा अगदी डोळ््यासमोर असल्याप्रमाणे पाहता आला व अचूक निदान करता आले.
धोका नाही हे एकदा स्पष्ट झाल्यावर सुयोग्य वेळी मेगनवर प्रचलित पद्धतीने सिझेरियन शस्त्रक्रिया करून तिची प्रसूती केली गेली. तिला मुलगा झाला व त्याचे नाव कोनान असे ठेवले गेले. (वृत्तसंस्था)
पर्याय अत्यंत कठीण होता
सिझेरियन शक्य झाले नसते तर डॉक्टरांना अत्यंत गुंतागुंतीची व बाळाच्या, कदाचित आईचाही जीव धोक्यात येईल, अशी प्रक्रिया करावी लागली असती. वैद्यकीय परिभाषेत याला ‘एक्स युटेरो इंट्रापार्टम ट्रीटमेंट प्रोसिजर’ (एक्झिट) असे म्हटले जाते. यात बाळाची आईच्या गर्भाशयाशी जोडलेली नाळ तशीच ठेवून अर्धवट प्रसूतीने बाळाच्या शरीराचा हवा तेवढाच भाग बाहेर काढून घेतला जातो. बाहेर काढलेल्या त्या भागातील दोष शस्त्रक्रियेने दुरुस्त करून बाळ दिवस पूर्ण भरेपर्यंत पुन्हा गर्भाशयात घातले जाते.