तुरूंगात जाता यावं म्हणून केला त्याने बॅंक लुटायचा प्लॅन, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 12:52 PM2019-07-09T12:52:59+5:302019-07-09T13:00:21+5:30
आपण हे नेहमीच ऐकत असतो की, माणूस हा स्वत:च्या इच्छेने कधी गुन्हेगार होत नसतो, त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते.
(Image Credit : dailythanthi.com)
आपण हे नेहमीच ऐकत असतो की, माणूस हा स्वत:च्या इच्छेने कधी गुन्हेगार होत नसतो, त्याला परिस्थिती गुन्हेगार बनवते. दक्षिण कोरियातील अशीच एक घटना वाचून तुम्ही हैराण व्हाल. एक व्यक्ती हातात चाकू घेऊन बॅंकेत शिरली आणि एकच गोंधळ उडाला. पण नंतर जेव्हा सिक्युरिटीने त्याला पकडलं तेव्हा लक्षात आलं की, त्याच्याकडील चाकू नकली होता. नंतर एक वेगळंच प्रकरण समोर आलं.
सियोल शहरापासून ९० मैल दूर Daejeon मध्ये एक बॅंक आहे. या बॅंकेत घुसलेल्या ४० वर्षीय व्यक्तीने नंतर त्याचा पूर्ण प्लॅन सांगितला. इतकंच नाही तर त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यावर पोलिसांनी त्याच्यावर केवळ धमकावण्याचा गुन्हा दाखल केलं, लुटमारीचा नाही. त्यामुळे त्याला शिक्षा होण्याचीही शक्यता कमी आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, चोरीची अॅक्टिंग करून त्याला तुरूंगात जायचं आहे.
पोलिसांनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती सामान्य आहे. तो खेळण्यातील चाकू घेऊन बॅंकमध्ये पोहोचला. त्याने केवळ कर्मचाऱ्यांना या चाकूने धाक दाखवला. त्याने ना पैसे मागितले, ना कुणाला इजा केली. बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी काही वेळात तिथे पोहोचून या व्यक्तीला अटक केली. बॅंक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, ही व्यक्ती त्याच्या वागण्यावरून, हालचालीवरून तरी चोर वाटत नाही. तसेच त्याने अटक होतांना स्वत:ला वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही.
म्हणून त्याला तुरूंगात जायचं होतं
पोलिसांनी नंतर खुलासा केला की, ही व्यक्ती बेरोजगार आहे आणि त्याच्या आईसोबत राहतो. त्याचा उद्देश बॅंक लुटण्याचा नव्हता. त्याला तरुंगात जायचे होते. जेणेकरून तो त्याच्यावर उपचार करू शकेल. त्याला पाठीचा त्रास आहे. उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळेच त्याने तुरूंगात जाण्यासाठी हा प्लॅन केला.
दक्षिण कोरियामध्ये २०१७ पासून बेरोजदारीचं प्रमाण वाढलं आहे. एका रिपोर्टनुसार, मे २०१७ पासून देशातील लोकसंख्येचा ३० टक्के भाग बेरोजगार आहे. हिवाळ्यात ही आकडेवारी अधिक वाढते. २०१९ मध्ये इथे बेरोजगारांची संख्या १.४ मिलियन इतकी आहे.