ऐकावं ते नवलच! 13 वर्षांपासून चोरतोय फक्त महिलांचेच रेनकोट; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 11:30 AM2022-10-03T11:30:38+5:302022-10-03T11:33:20+5:30
गेल्या 13 वर्षांपासून योशिदा महिलांचे रेनकोट चोरत होता आणि याच गुन्ह्यासाठी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
जपानमधल्या एका चोराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. याने एक अशी वस्तू चोरली आहे ज्याचा तुम्ही विचारही कधी केला नसेल. जपानमधली या व्यक्तीच्या मनात एकेदिवशी पुरुषांचे नव्हे तर महिलांचे रेनकोट जमवण्याचा विचार आला. यासाठी त्याने शोधलेली पद्धत खूपच थक्क करणारी आहे. ही व्यक्ती महिलांचे रेनकोट चोरत होती. पोलीस 10 वर्षांपासून या व्यक्तीचा शोध घेत होते. अखेरीस या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
`ऑडिटी सेंट्रल` या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षांच्या योशिदो योदा याला जपानमधील ओसाकामधून पोलिसांनी अटक केली. गेल्या 13 वर्षांपासून योशिदा महिलांचे रेनकोट चोरत होता आणि याच गुन्ह्यासाठी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो लपून गुन्हे करत असे आणि 10 वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अटक होईपर्यंत पोलिसांनी त्याला `रेनकोट मॅन` असं नाव दिलं होतं.
2009 पासून करत होता रेनकोटची चोरी
रिपोर्टनुसार, योशिदो घरोघरी वृत्तपत्र वाटपाचं काम करत होता. एक दिवस अचानक त्याला कप्पा जमा करण्याचा विचार सुचला. कप्पा हा जपानी कापडाचा एक प्रकार आहे जे प्लॅस्टिकपासून तयार केलेलं असतं आणि कपडे ओले होऊ नये यासाठी ते कपड्यांवर परिधान केलं जातं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योशिदो 2009 पासून रेनकोटची चोरी करत होता. घराची झडती घेतली तेव्हा घरातून 360 रेनकोट पोलिसांनी जप्त केले. यापैकी सुमारे 320 रेनकोट हे मागच्या 10 वर्षांत चोरी केलेले होते.
पोलिसांनी योशिदोच्या चोरीची पद्धतही स्पष्ट केली. पोलिसांनी सांगितलं की, योशिदो अनेकदा सायकल चालवणाऱ्या महिलांचा पाठलाग करत किंवा अशी सायकल किंवा बाईक शोधायचा जी महिला वापरतात. मग त्यात पडलेल्या वस्तूंवर नजर ठेवायचा. त्यात त्याला रेनकोट दिसला तर तो चोरी करायचा. जेव्हा पोलिसांनी त्याला रेनकोट का चोरायचा असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ``जसे इतर पुरुष महिलांना अंडरगारमेंटमध्ये पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, त्याचप्रमाणे मला रेनकोट परिधान केलेल्या महिलांना पाहणं आवडतं म्हणून मी त्यांचे रेनकोट चोरत असे.`` पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योशिदोने आतापर्यंत सहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेनकोट चोरले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"