आजी राहीली गरोदर, दिला स्वत:च्याच नातीला जन्म, सोशल मिडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 03:50 PM2021-08-29T15:50:59+5:302021-08-29T16:43:38+5:30
सोशल मीडियावर अशाच एका आईची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral News) होत आहे. तिनं आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी चक्क आपल्याच नातीला जन्म दिला .
स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं. ते खरंच आहे आईची (Mother) मायाच अशी असते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. सध्या सोशल मीडियावर (social media) अशाच एका आईची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral News) होत आहे. तिनं आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी चक्क आपल्याच नातीला जन्म दिला .
द सननं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना ब्राझीलमधील (Brazil) सेंट कटरीना शहरातील आहे. इथे एका ५३ वर्षाच्या महिलेनं आपल्या नातीला जन्म दिला. या महिलेचं नाव रोजिकलिया डी अब्रू कार्सेम. त्यांना २९ वर्षाची मुलगी आहे. तिला २०१४ पासून पल्मनरी एम्बॉलिज्म नावाचा आजार आहे. या आजारात रक्ताच्या गाठी शरीरात जमा होतात. अशात डॉक्टर प्रेग्नंसीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे त्या महिलेच्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती. मात्र, याबद्दल रोजिकलिया यांना माहिती झालं तेव्हा त्यांनी स्वत:च्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आणि तिला आई होण्याचं सुख मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला
आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना रोसिकलिया यांनी सांगितलं, की त्यांचं त्यांच्या मुलीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आपल्या मुलीसाठी त्यांनी हे केलं. रोसिकलिया म्हणाल्या की मी भाग्यवान आहे की मी माझ्या मुलीला आणि नातीलाही जन्म देऊ शकले. रोसिकलिया यांच्या मुलीचं नाव इन्ग्रिड आहे आणि तिच्या पतीचं नाव फॅबिआना आहे. दोघंही आपल्या मुलीच्या जन्मानंतर अतिशय आनंदी आहेत. IVF च्या मदतीनं या बाळाचा जन्म झाला आहे. यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च आला. हे पैसे क्राउड फंडिंगद्वारे जमवण्यात आले.