अचानक खात्यात आले 57 कोटी, घर-गाडी खरेदी केले; नंतर झाली फजीती...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 06:20 PM2022-09-01T18:20:48+5:302022-09-01T18:22:37+5:30
महिलेने मनमोकळेपणाने खर्च केला, पण नंतर सत्य समजताच तिची पायाखालची जमीन सरकली.
Viral News: तुमच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले आणि तुम्ही त्यातून जमीन, घर, गाडी आणि इतर काही वस्तू खरेदी केल्या. पण, नंतर समजले की, ते पैसे चुकून आले आहेत आणि आता परत करावे लागणार, त्यावेळेस तुमची अवस्था काय असेल..? असाच प्रकार ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला. महिलेच्या खात्यात अचानक 10.5 मिलियन डॉलर (57 कोटींहून अधिक) आले.
$100 ऐवजी 57 कोटी पाठवले
मिळालेल्या माहितीनुसार, क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रिप्टो डॉट कॉमने थेवामनोगरी मॅनिवेल नावाच्या ऑस्ट्रेलियन महिलेच्या खात्यात चुकून 57 कोटींहून अधिक रक्कम जमा केली. त्या फर्मला महिलेच्या खात्यात फक्त $100 पाठवायचे होते, परंतु चुकून ऑस्ट्रेलियन $10.5 मिलियन पाठवले. विशेष म्हणजे, या फर्मला अनेक महिने याची माहितीच झाली नाही. क्रिप्टो डॉट कॉमला सुमारे 7 महिन्यांनंतर आपली चूक समजली. हा प्रकार कळताच कंपनीतील अधिकारी भानावर आले.
7 महिन्यांनंतर समजला घोळ
मे 2021 मध्ये हे पैसे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहणाऱ्या या मॅनिवेलच्या खात्यात ट्रान्सफर केले होते आणि डिसेंबर 2021 मध्ये कंपनीला याची माहिती मिळाली. ही कंपनी फोरिस GFS नावाने ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय करते. मॅनिवेलचे पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे तिच्या खात्यात $100 परत करणे अपेक्षित होते, परंतु चुकून $10.5 मिलियन गेले. खात्यात अचानक 57 कोटी रुपये येणे मॅनिवेलसाठी धक्कादायक होते. मात्र याची खबर तिने कुणालाही कळू दिली नाही. द गार्डियनमधील वृत्तानुसार, या पैशातून महिलेने उत्तर मेलबर्नच्या पॉश क्रेगीबर्न भागात A$1.35 मिलियनमध्ये चार बेडरूमचे आलिशान घर विकत घेतले. याशिवाय तिने हे पैसे अनेक ठिकाणी बिंदास्तपणे खर्च केले.
आता व्याजासह पैसे परत करावे लागणार
कंपनीने महिलेविरोधात ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. या फर्मला कोर्टाकडून मॅनिवेलचे खाते जप्त करण्याचे आदेश मिळाले, परंतु या महिलेने खात्यातील पैशांचा मोठा हिस्सा आधीच खर्च केला होता. यानंतर, फर्मने पुन्हा न्यायालयात धाव घेतली, ज्यावर मॅनिवेलने ज्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले होते ती खाती गोठवण्याचे आदेश मिळाले. अचानक कोट्यवधी रुपयांची मालकिन बनलेल्या मॅनिवेलच्या अडचणीत वाढ होऊ लागली. तिला पैसे परत करण्याच्या नोटिसा येऊ लागल्या. आता महिलेला तिची मालमत्ता विकून पैसे लवकरात लवकर परत करावे लागणार आहेत. यासह, व्याज म्हणून $ 27,369.64 ची रक्कमदेखील द्यावी लागेल.