घरात लागली होती आग, ६ वर्षाच्या मुलीने 'असा' वाचवला सर्वांचा जीव!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:31 AM2020-01-22T10:31:18+5:302020-01-22T10:31:43+5:30
सोशल मीडियावर एका बहादूर मुलीचा कारनामा चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना आहे अमेरिकेतील न्यू जर्सीची.
सोशल मीडियावर एका बहादूर मुलीचा कारनामा चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना आहे अमेरिकेतील न्यू जर्सीची. इथे राहणाऱ्या एक ६ वर्षाच्या मुलीने घरात आग लागल्याची माहीत वेळेवर वडिलांना दिली, त्यामुळे घरातील सगळे सुरक्षित बाहेर निघू शकले. ही संपूर्ण घटना एवेनेल फायर डिपार्टमेंटने फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांनी या चिमुकलीला 'हिरो' म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये डिपार्टमेंटने लिहिले की, 'या मुलीला तुम्ही बघताय. तिचं नाव आहे मॅडलिन कार्लबोन. ही आमचे माजी फायर फायटर सहकारी कार्लबोनची मुलगी आहे. ती केवळ ६ वर्षांची आहे. ती रात्री स्मोक डिटेक्टरच्या आवाजाने जागी झाली. तिने धूर पाहिला आणि वेळीच वडिलांना जागं करण्यासाठी पळत गेली. तिने आगीबाबत त्यांना सांगितले आणि न घाबरता या स्थितीचा सामना केला. यात मुख्य योगदान तिच्या वडिलांचं आहे. कारण त्यांनी मुलीला अशा स्थितीत काय करायचं हे शिकवलं. ही फारच समजदार मुलगी आहे. तिच्या बहादूरी आणि समजदारीमुळे वेळीच घरातून सर्वांना बाहेर काढता आलं. आम्हाला तुझा अभिमान आहे. तू हिरो आहेस मॅडलिन'.
डिपार्टमेंटने त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, 'सकाळी साधारण २ वाजून १७ मिनिटांनी एवेनेल फायर डिपार्टमेंटची एक टीम घरातील आग विझवण्यासाठी निघाली. त्यांना तिथे पोहोचल्यावर कळाले की, ते घर आमचे माजी चिफ जिम्मी कार्लबोन यांचं आहे. त्यांना दोन मुले आहेत. मुलीचं नाव मॅडलिन आणि २ वर्षीय मुलाचं नाव हंटर आहे. ते सगळेच सुदैवाने वेळीच घराबाहेर पडले. पण घरातील सगळंच सामान जळालं आहे. तसेच घर राहण्या लायकही राहिलं नाही. ते सध्या एक हॉटेलमध्ये राहत आहेत'.
या पोस्टवर लोकांनी मुलीचं आणि तिच्या बहादुरीचं भरभरून कौतुक केलं आहे. लोक यावर कमेंट करत आहेत आणि डिपार्टमेंटची पोस्ट शेअर करत आहेत.