अबब! नर्मदा नदीत आढळला ७ किलोचा तरंगता दगड; हा चमत्कार नव्हे तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:16 AM2021-10-07T08:16:22+5:302021-10-07T08:16:50+5:30
देरोली गावातील युवक मासेमारीसाठी त्याची बोट घेऊन नर्मदा नदीत गेला होता. त्याला पाण्यात तरंगती वस्तू दिसली.
वडोदरा (गुजरात) : वडोदराजवळ देरोली गावाजवळून वाहणाऱ्या नर्मदा नदीत जवळपास ७ किलो वजनाचा दगड आढळला असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यात बुडत नाही. स्थानिक लोकांची श्रद्धा हा दगड रामसेतूतून तुटून वाहत गावात आला असावा अशी आहे. वैज्ञानिक तथ्यानुसार तरंगता दगड ही सामान्य बाब आहे.
देरोली गावातील युवक मासेमारीसाठी त्याची बोट घेऊन नर्मदा नदीत गेला होता. त्याला पाण्यात तरंगती वस्तू दिसली. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काम संपवून तो नदीच्या त्या जागी आला तेव्हाही ती वस्तू तरंगतच होती. त्याने ती वस्तू बाहेर काढून पाहिली तर तो तरंगणारा दगड होता. त्याला त्याचे आश्चर्य वाटले. त्याने तो दगड आणला व लोकांना दाखवला. त्यांनाही आश्चर्य वाटले.
चमत्कार नाही
एम. एस. विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर के. सी. तिवारी म्हणाले की, “काही विशिष्ट प्रकारचे दगड तरंगणे ही सामान्य बाब आहे. काही कोरल्स स्टोन, चुन्याचे किंवा ज्वालामुखीतून निघालेले दगड वजनदार तर असतात, पण त्यांच्यात जी कमी घनता असते त्यामुळे ते पाण्यात हलके राहतात. यामुळे आणि त्यांच्यातील छिद्रांत हवा भरल्यामुळे हे दगड पाण्यात तरंगतात. यात कोणताही चमत्कार नाही.”