टेस्टट्यूब बेबीच्या सहाय्याने 70 वर्षांची आजी झाली आई
By admin | Published: May 10, 2016 12:46 PM2016-05-10T12:46:15+5:302016-05-10T13:28:52+5:30
आयव्हीएफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने दलजिंदर कौर आणि मोहिंदर सिंग गिल यांना लग्नाच्या 46 वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 10 - आई होण्याचा आनंद काही वेगळाच असतो...मात्र हा दिवस पाहण्यासाठी दलजिंदर कौर यांना वयाच्या 72व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. 19 एप्रिलला दलजिंदर कौर यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दलजिंदर कौर यांच्या लग्नाला 46 वर्ष झाली आहेत तसंच मेनोपॉजलादेखील 20 वर्ष होऊन गेली आहेत. मात्र आयव्हीएफ ( In Vitro Fertilisation) म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने दलजिंदर कौर आणि मोहिंदर सिंग गिल यांना पुत्रप्राप्ती झाली आहे.
73 वर्षीय मोहिंदर सिंग गिल मुलं होण्यासाठी 2013 पासून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसोबत अमृतसरपासून ते हिसारपर्यंत प्रवास केला. आपल्या पत्नीला व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. याअगोदर दोनवेळा दलजिंदर कौर यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने आई होण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश आलं नव्हतं. अखेर जुलै महिन्यात त्यांच्यावरील ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रक्रिया यशस्वी झाली.
'दलजिंदर कौर सर्वात प्रथम 2013 मध्ये माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी वृत्तपत्रात वाचलं होतं', अशी माहिती अनुराग बिष्णोई यांनी दिली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने 70 वर्षीय महिला आई होण्याची ही दुसरी घटना आहे. 2006 मध्ये राजो देवी यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने मुलीला जन्म दिला होता.
IVF / टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय ?
IVF (In Vitro Fertilization) म्हणजेचं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 दिवसांपासून इंजेक्शन सुरु होतात. जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते आणि दुस-या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरु करतात. पाळीच्या 9 दिवसांपासून Folicular Study करुन अंडाशयातील वाढ 18 मिमी पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर शस्त्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मिलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ इंक्युबेटरमध्ये 2 ते 3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रुजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.