दुर्मिळ आजारामुळे दाढी-मिशा आल्या; तिने वाढवल्या अन् गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:35 PM2023-04-07T17:35:17+5:302023-04-07T17:35:57+5:30
लोकांनी चिडवले, टोमणे मारले; तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, जाणून घ्या महिलेची कहाणी...
74 वर्षीय महिला पुन्हा एकदा तिच्या दाढी आणि मिशांमुळे चर्चेत आली आहे. जगात कोणत्याच महिलेला या महिलेएवढी दाढी नाही. दाढी आणि मिशामुळे या महिलेचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. हायपरट्रिकोसिस सिंड्रोममुळे महिलेच्या चेहऱ्यावर केसांची वाढ झाली. सुरुवातीला महिला कंटाळली होती, पण नंतर तिला सवय झाली आणि हळुहळून तिने दाढी-मिशा वाढवणे सुरू केले. एका मुलाखतीत या महिलेने तिची कहाणी सांगितली.
विवियन व्हीलर असे या 74 वर्षीय महिलेचे नाव आहे. तीन मुलांची आई विवियन अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील रहिवासी आहे. एप्रिल 2011 मध्ये तिने 'सर्वात लांब दाढी असलेली महिला' असा मान मिळवला आणि त्यासाठी तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. तिची दाढी 25 सेमी लांब आहे. हायपरट्रिकोसिस व्यतिरिक्त, विवियन हर्माफ्रोडिटिझम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारात एक व्यक्ती एकाच वेळी नर आणि मादी दोन्ही प्रजनन पेशी तयार करते.
लोकांचे टोमणे ऐकले, मग हा निर्णय घेतला
विवियन म्हणते की, तिच्या दाढी आणि मिशांमुळे तो जगापासून बहिष्कृत झाला होता. ना तिचे मित्र बनत ना कोणी तिच्यासोबत खेळायया येत. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. ती मोठी झाल्यावर सर्कसमध्ये सामील झाली आणि तिथे काम करू लागली. तिथून त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे बळ मिळाले. 1990 पासून तिने मिशा आणि दाढी कापण्याचे बंद केले. विवियन म्हणते की, मी दाढीशिवाय काहीच नाही. कोणी काहीही म्हणले तरी, मी माझ्या मार्गावर चालत राहीन.
हायपरट्रिकोसिस सिंड्रोम म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील केसांच्या वाढीच्या असामान्य स्थितीला हायपरट्रिकोसिस सिंड्रोम म्हणतात. हा दोन प्रकारचा असतो. एका स्थितीत पीडितेच्या शरीराच्या काही भागांवर केस येतात. तर दुस-या स्थितीत एका ठराविक भागावर केस येतात. याला वेअरवूल्फ सिंड्रोम असेही म्हणतात. हा सिंड्रोम पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. परंतु हा एक अत्यंत दुर्मिळ सिंड्रोम आहे जो दशलक्ष लोकांपैकी फक्त एकामध्ये होतो.