आईला मृत्यूच्या दाढेतुन खेचुन आणलं, ९ वर्षाच्या चिमुकल्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:55 PM2022-07-29T20:55:19+5:302022-07-29T21:00:23+5:30
9 वर्षांच्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आहे. भयंकर अपघातात गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जीव तिच्या मुलामुळे वाचला आहे. इतक्या कमी वयात मुलाने आईला वाचवण्यासाठी जी धडपड केली, त्यासाठी त्याचं कौतुक केलं जातं आहे.
आतापर्यंत आई-वडीलांनी आपल्या लेकरांना वाचवल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील पण सध्या एका आईला वाचवणारा लेक चर्चेत आला आहे. 9 वर्षांच्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं आहे. भयंकर अपघातात गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जीव तिच्या मुलामुळे वाचला आहे. इतक्या कमी वयात मुलाने आईला वाचवण्यासाठी जी धडपड केली, त्यासाठी त्याचं कौतुक केलं जातं आहे.
आई-वडील आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात पण वेळ पडल्यास लहान मुलंही आपल्या आईवडिलांसाठी मोठी होऊन त्यांच्यासाठी काहीही करू शकतात हे या 9 वर्षांच्या मुलाने दाखवून दिलं आहे. चीनच्या अनहुई प्रांतातील ही घटना आहे.
मीडिया रिपोर्टनुसार एक महिला इलेक्ट्रिक सायकलवरून आपल्या मुलाला घेण्यासाठी आली होती. रस्त्यात तिच्या सायकलला एक कार धडकली. भयंकर अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली. तिच्या डोक्यातून खूप रक्त येत होतं. रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होऊन ती रस्त्यावर पडली होती.
आईची अवस्था पाहून मुलगा खूप घाबरला. आईला शुद्धीवर आणण्यासाठी तो तिला मोठमोठ्याने हाका मारत, हलवत होता. पण त्याची आई काही शुद्धीवर येईना. शेवटी त्याने आपल्या आईला सीपीआर द्यायला सुरुवात केली. अॅम्बुलन्स येईपर्यंत आईला उन्हापासून वाचवण्यासाठी तिच्यावर छत्री धरून तिच्याजवळ बसू राहिला.
या घटनेचा व्हिडीओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही घटना 19 जुलैची असल्याचं सांगितलं जातं आहे. लेकाने आईला वाचवण्यासाठी जे केलं, त्यासाठी त्याचं कौतुक केलं जातं आहे.
मुलाच्या वडिलांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, आमचा मुलगा 9 वर्षांचा आहे आणि आम्ही त्याला सीपीआर देणं शिकवलं नाही. टीव्ही पाहून तो स्वतःच ते शिकला. पत्नीला गंभीर दुखापत असून रुग्णालयात नेताना ती शुद्धीवर आली आणि आता तिच्यावर उपचार सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं.