नव्वदीच्या आजीबाईंचा बटवा; आठवड्याला तपासतात चक्क 600 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 05:32 PM2020-01-12T17:32:53+5:302020-01-12T17:34:12+5:30
चीनच्या जियांगसू प्रांतामध्ये नानजिंग शहर आहे.
काहीतरी विधायक, समाजोपयोगी करायची इच्छा असेल तर वय आड येत नाही. याच इच्छाशक्तीने वय आणि आजारपण बाजुला ठेवून लोक सेवा करत राहतात. चीनमधील अशाच एक डॉक्टर आजी वयाची नव्वदी उलटली तरीही रुग्णांची सेवा अथकपणे करत आहेत. महत्वाचे म्हणजे त्या आठवड्याला 600 रुग्ण तपासतात.
चीनच्या जियांगसू प्रांतामध्ये नानजिंग शहर आहे. या शहरातील सीटी हॉस्पिटलमध्ये डॉ. आओ झोंगफैंग या 92 वर्षांच्या डॉक्टर आजी आजही रुग्णांची तपासणी करतात. त्यांना 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 1994 मध्ये त्या निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीवेळीच त्यांनी निर्णय घेतला होता की त्या नेहमी गरजूंची मदत करत राहतील. यासाठी त्यांनी निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा हॉस्पिटलला जाऊ लागल्या.
या आजी एका आठवड्याला जवळपास 600 लोकांना तपासतात. त्या एक फिजिशिअन आणि रक्त रोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे पती आणि मुलगाही डॉक्टरच आहे. मुलगा जेंग शिलाँगही त्याच हॉस्पिटलमध्ये काम करतात. ते सांगतात की त्यांचे आई वडील आजही रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त असतात. त्यांचे काम पाहूनच मी वैद्यकीय क्षेत्रात आलो.
डॉक्टर आजींचा जन्म 1928 मध्ये झाला होता. त्या सांगतात की या सेवेमध्ये समाधान मिळते. मी पुढेही माझे काम करत राहीन. माझ्या डॉक्टरी पेशावर प्रेम असल्याने मी वयाचा विचार करत नाही. रुग्णांना तपासतानाच मला मृत्यू यावा अशी इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.