95 तासात तीन देश, 33 तासांचा विमान प्रवास, मोदींचा आतापर्यंतचा सर्वात व्यस्त दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 11:44 AM2017-06-28T11:44:17+5:302017-06-28T15:03:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी जेव्हा भारतात पोहोचले तेव्हा त्यांनी आतापर्यंतचा आपला सर्वात व्यस्त दौरा पुर्ण केला होता
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी जेव्हा भारतात पोहोचले तेव्हा त्यांनी आतापर्यंतचा आपला सर्वात व्यस्त दौरा पुर्ण केला होता. तीन देशांच्या दौ-यावर गेलेल्या मोदींनी दौरा व्यस्त असतानाही अत्यंत जलदगतीने तो पुर्ण केला. विशेष म्हणजे या दौ-यात अमेरिकेचाही समावेश होता. आजवरच्या त्यांच्या परदेश दौ-यांमधील हा सगळ्यात हेक्टिक होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नरेंद्र मोदी अमेरिका, पोर्तुगाल आणि नेदरलँण्ड्सच्या दौ-यावर होते. या दौ-यासाठी मोदींना एकूण 95 तासाहून जास्त लागले, पण विशेष म्हणजे यामधील 33 तास त्यांनी विमान प्रवास केला. म्हणजे तब्बल 33 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी एअरप्लेन मोडमध्ये होते. आश्चर्य वाटेल मात्र त्यांनी तिन्ही देशांमध्ये सलग 33 कार्यक्रम आणि बैठकींना हजेरी लावली.
पंतप्रधान मोदींनी आपल्या या व्यस्त दौ-यातील चार पैकी दोन रात्री विमानातच घालवल्या. पोर्तुगाल किंवा नेदरलँण्डमध्ये मुक्काम करण्याचा पर्याय मोदींकडे असतानाही त्यांनी तो वेळ तिथे खर्च करण्याऐवजी विमान प्रवासात करण्यावर भर दिला. दुस-या दिवशी सकाळी मीटिंग नसेल तर नरेंद्र मोदी त्या रात्री त्या देशात मुक्काम करत नाहीत. वेळेतील फरकाचा फायदा घेत कामाचे तास कसे वाढतील ते बघा अशा सूचना देण्यात येतात.
मोदींनी आपला हा नियम लिस्बनहून वॉशिंग्टन डीसीला जाताना तसंच हॉगला प्रवास करताना पाळला. भारतात परततानाही मोदींनी आपल्या याच नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.
पंतप्रधान मोदींनी 24 जूनला दिल्लीहून सकाळी सात वाजता प्रवास सुरु केला. 10 तासांच्या विमान प्रवासानंतर लिस्बनला पोहोचल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन मुक्काम करण्यापेक्षा लिस्बन विमानतळाच्या व्हीव्हीआयपी लाऊंजमधे वर्किंग लंच घेत तिथून सरळ पोर्तुगाल विदेश मंत्रालय गाठलं. तिथे बैठक आणि लंच झाल्यानंतर त्यांनी तिथे राहणा-या भारतीयांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी थेट लिस्बन विमानतळ गाठलं आणि स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता वॉशिंग्टन डीसीकरिता प्रवास सुरु केला.
आठ तासांच्या प्रवासानंतर मोदी वॉशिंग्टनला पोहोचले. तेव्हा भारतात पहाटेचे चार वाजले होते. तिथे पोहोचल्यानंतर 50 सदस्यांच्या भारतीय टीमने विलर्ड कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये चेक इन केलं. पुढील दोन दिवसांमध्ये मोदींचे एकूण 17 कार्यक्रम आयोजित होते, यामध्ये अमेरिकेतील सीईओंना भेटणं तसचं व्हाईट हाऊसमधील कार्यक्रमांचा समावेश होता. मोदींनी दुसरी रात्र मात वॉशिंग्टनमध्ये न घालवता रात्री 9 वाजता नेदरलँण्डसाठी प्रवास सुरु केला.
नेदरलँण्डमध्येही मोदींचे सात कार्यक्रम आयोजित होते, यामध्ये संध्याकाळी भारतीयांना संबोधित करणार होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता त्यांनी दिल्लीसाठी विमान प्रवास सुरु केला.
यावेळी नेदरलँण्डचे पंतप्रधान मार्क रुट यांनी नरेंद्र मोदींना सायकल भेट दिली.
अखेर आपला हा व्यस्त आणि धावपळीटा दौरा संपवत पंतप्रधान मोदी आज सकाळी 6.30 वाजता दिल्लीत दाखल झाले. आज वर्किंग डे असल्याने मोदी विश्रांती न घेता पुन्हा कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे उद्या मोदींचा गुजरात दौरा असणार आहे.