चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:32 AM2024-09-10T05:32:03+5:302024-09-10T05:34:22+5:30

मातीचं तर ते भांडं. फुटलं ते. त्यात काय एवढं, असं कोणालाही वाटेल, पण मातीचं हे भांडं साधंसुधं नव्हतं.

A 3500-year-old clay pot in a museum in Israel bursts, mourning in the country | चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय?

चिमुकल्याकडून मातीचं भांडं फुटलं, अख्खा देश शोकसागरात; नेमकं कारण तरी काय?

गोष्ट आहे इस्रायलमधली. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. एक चार वर्षांचा मुलगा आपल्या आईबरोबर एका ठिकाणी गेला होता. चार वर्षांचा मुलगा म्हटल्यावर त्याची समज ती काय असणार? इथे हात लाव, तिथे हात लाव, हे उचक, ते उचक असं ते करणारच. त्यांनी तसं केलं नाही, तरच नवल. त्यात हे मूल थोडं जास्तच ॲक्टिव्ह. त्यामुळे त्याच्या आईला थोडी जास्तच काळजी घ्यावी लागायची. 

कोणाकडे गेल्यानंतर आपल्या मुलानं कुठे हात लावू नये, काही उचकपाचक करू नये, यासाठी ती अतीव दक्ष असायची. कारण ती आईही तशी चांगलीच शिस्तीची आणि दक्ष होती. आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ती कायम जागरूक असायची. तरीही त्या दिवशी ती घटना घडलीच. दोन्ही मायलेक ज्या ठिकाणी गेले होते, त्याठिकाणी असलेल्या एका मातीच्या भांड्याला बालसुलभ उत्सुकतेनं त्या मुलानं हात लावलाच. आणि आईनं घाईनं त्याचा हात आवरण्याआधीच ते भांडं खाली पडलं आणि फुटलं! 

या घटनेवरून सध्या अख्खं इस्रायल हळहळ आणि दु:ख व्यक्त करीत आहे, असं म्हटलं तरी चालेल! प्रत्येक सजग माणसाला त्यामुळे धक्का बसला आणि त्यांच्या तोंडातला पहिला उद्गार होता, अरेरे! असं व्हायला नको होतं! अर्थात प्रत्येकानं त्याबद्दल चिंता, हळहळ व्यक्त केली तरी त्या मुलाला किंवा त्याच्या आईला कोणीच काही बोललं नाही, रागावलं नाही. त्या मातेनं मात्र आपल्या या मुलाच्या चुकीबद्दल किमान शंभर वेळा तरी माफी मागितली आणि तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं.

मातीचं तर ते भांडं. फुटलं ते. त्यात काय एवढं, असं कोणालाही वाटेल, पण मातीचं हे भांडं साधंसुधं नव्हतं. हे भांडं थोडंथोडकं नव्हे, तब्बल ३५०० वर्षांपूर्वीचं होतं. इस्रायलच्या हाइफा युनिव्हर्सिटीतील हेक्ट म्युझियममध्ये ते ठेवण्यात आलं होतं. या भांड्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत पुरातन तर होतंच, पण ते अखंड होतं. मातीचं भांडं इतकं पुरातन, ३५०० वर्षांपूर्वीचं असूनही अखंड स्थितीत ते सापडणं, हा एक मोठा चमत्कार मानला जातो. 

या भांड्याच्या रूपानं एक खूप किमती सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेवा या म्युझियमनं तो प्राणापलीकडे जपून ठेवला होता. त्या काळच्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारा तो ऐवज होता. त्यामुळेच त्याचं महत्त्व प्रचंड होतं. त्यामुळेच मातीचं एक भांडं फुटलं, तरीही अख्खा देश हळहळला.  आपल्या मुलामुळे हे सारं घडल्यामुळे त्या मातेच्या डोळ्यांतला अश्रूंचा पूर तर थांबता थांबत नव्हता. ॲलेक्स हे त्या मातेचं नाव. त्या भांड्यात काय आहे, या उत्सुकतेपोटी मुलानं भांड्याला हात लावला आणि काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. मी काहीही करू शकले नाही. मी मुलाकडे लक्ष द्यायला हवं होतं. याबद्दल मी स्वत:ला कधी माफ करू शकणार नाही. 

काहीजण यासंदर्भात म्युझियमच्या व्यवस्थापनालाही दोष देतील, की इतकी किमती वस्तू सहजपणे मुलांच्या हाती लागू शकेल अशी का ठेवण्यात आली? ती बंदिस्त काचेत का ठेवण्यात आली नाही? तसं केलं असतं तर हा ऐतिहासिक ठेवा विद्रुप झाला नसता! पण याहीबाबतीत या म्युझियमचं मोठेपण खूप मोठं आहे.  संग्रहालयाचे महासंचालक डॉ. इनबाल रिव्हलिन यांनी सांगितलं, संग्रहालयाचे संस्थापक डॉ. रुबेन हेक्ट यांनी हा नवा उपक्रम सुरू केला. ऐतिहासिक, पुरातन ठेवा लोकांनी  जवळून अनुभवल्यास त्या काळाचा फील त्यांना येऊ शकतो. याशिवाय नागरिक अशा गोष्टींविषयी सजग, गंभीर असतातच, यावर त्यांचा विश्वास होता! त्यामुळे त्यांनी लोकांना या ऐतिहासिक वस्तू जवळून पाहण्यासाठी अनुमती दिली.

कांस्य युगातील म्हणजे राजा सोलोमनच्याही आधीच्या काळातील हे भांडं होतं. इसवीसनपूर्व २२०० ते १५०० या काळातील हे भांडं असावं असं मानलं जातं. डॉ. इनबाल यांचं म्हणणं आहे, मद्य आणि ऑलिव्हा ऑइलसाठी या भांड्याचा वापर केला जात असावा. खोदकामात अनेकदा तुटलेल्या किंवा अर्धवट, जीर्ण अवस्थेतील वस्तू सापडतात, पण हे भांडं मात्र संपूर्णपणे अखंड होतं. त्यामुळेच या भांड्याचं महत्त्व अतिशय जास्त होतं. 

संग्रहालयाचा मोठेपणा! 
नागरिकांना, अभ्यासकांना या भांड्याचा जवळून ‘अनुभव’ घेता यावा यासाठी संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळच ते ठेवण्यात आलं होतं. या भांड्यांची आता पुन्हा दुरुस्ती केली जाईल, पण ते आता पूर्वीसारखं कधीच होणार नाही! ऐतिहासिक ठेव्यांचं मुद्दाम नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते, पण या घटनेत कोणाचाही दोष नव्हता. विशेष म्हणजे ज्या मुलानं हे भांडं तोडलं, त्याला आणि त्याच्या परिवाराला हे म्युझियम पाहण्यासाठी सन्मानानं पुन्हा बोलवण्यात आलं आहे!

Web Title: A 3500-year-old clay pot in a museum in Israel bursts, mourning in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.