कबाब खरेदी करायला गेला अन् १० कोटींचा मालक झाला; बस ड्रायव्हर कोट्यधीश बनला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:28 AM2023-05-24T08:28:07+5:302023-05-24T08:30:10+5:30
कबाब खाण्यासाठी गेलेला ड्रायव्हर एका क्षणात १० कोटींचा मालक बनला या बातमीची सगळीकडे चर्चा सुरू झाली.
कुणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. एका ड्रायव्हरची कहाणी ऐकून तुम्हालाही असेच वाटेल. चिकन कबाब खरेदी करण्यासाठी गेलेला हा ड्रायव्हर तब्बल १० कोटींचा मालक बनला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. कोट्यधीश बनल्यानंतर ड्रायव्हरचा आनंद पारावर राहिला नाही. या पैशाचा वापर कशा कुटुंबाच्या सुखासाठी करणार आहे त्याबाबत त्याने प्लॅनिंग सांगितले. ही घटना ब्रिटनच्या लीसेस्टर येथील आहे.
मिरर यूके रिपोर्टनुसार, ५१ वर्षीय या बस ड्रायव्हरचे नाव स्टीव्ह गुडविन असे आहे. अलीकडेच तो प्रवासादरम्यान एका कबाब शॉपवर थांबला होता. कबाब येण्यासाठी वेळ होता त्यामुळे टाइमपास करण्यासाठी तो आजूबाजूला फिरत होता. त्यावेळी जवळच एक नॅशनल लॉटरीचे दुकान दिसले. येथे जाऊन ड्रायव्हरने एक तिकिट खरेदी केली. हेच तिकीट त्याचे आयुष्य बदलेल याचा विचारही त्याच्या मनात आला नसेल. मात्र या तिकीटामुळे ड्रायव्हरला तब्बल १ मिलियन पाऊंड म्हणजे १० कोटी २५ लाखांची लॉटरी लागली आहे.
कोट्यधीश बनल्यानंतर स्टीव्ह यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्टीव म्हणाला की, कबाब ऑर्डर दिल्यानंतर मी थोडावेळ बाहेर भटकत होतो. चहा आणि जेवणाची वाट पाहत होतो. त्यावेळी शेजारी लॉटरी सेंटर दिसले. मी तिथे जात एक तिकीट खरेदी केले. ज्याने माझे नशीब पालटले. लॉटरीत जिंकलेल्या पैशातून सर्वात आधी मी नवीन घर खरेदी करणार आहे. त्यानंतर माझ्या पार्टनरला घेऊन परदेश दौऱ्यावर जाणार आहे. मला इतकी मोठी रक्कम मिळेल याची अपेक्षा नव्हती. परंतु जेव्हा लॉटरी ऑफिसमधून कर्मचाऱ्यांनी फोन केला तेव्हा मी हैराण झालो. कबाब खाण्यासाठी गेलेला ड्रायव्हर एका क्षणात १० कोटींचा मालक बनला या बातमीची सगळीकडे चर्चा सुरू झाली.
लॉटरी लागल्यानंतर स्टीव्हने आधी आईला फोन करून आनंदाची वार्ता सांगितली. पण सुरुवातीला कुटुंबातील कोणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, नंतर सर्वांना कळले की स्टीव्ह खरे बोलत आहे. लॉटरी लागल्यानंतरही स्टीव्ह अजूनही ड्रायव्हर म्हणून त्याचे काम करत आहे.