पुण्याच्या लेकीचं ऑनलाइन लग्न; पंडिताला दिलेली दक्षिणा ऐकून सगळेच झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:59 PM2023-05-26T12:59:15+5:302023-05-26T12:59:37+5:30
मुलांची अडचण पाहता घरच्यांनी सिवनीतील ६७ वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्याशी बोलून विवाह मुहूर्त काढला
सिवनी - सध्या ऑनलाईनच्या युगात लग्नही होऊ लागली आहेत. त्यात मध्य प्रदेशातील सिवनी इथं बसलेल्या एका पंडिताने अमेरिकेतील युवक-युवतीचे ऑनलाईन लग्न जमवले. २१ मे रोजी हे लग्न अमेरिकेतून वर-वधू आणि इतर पाहुणे मंडळी ऑनलाईन सहभागी झाले. यावेळी पंडिताने लॅपटॉपच्या समोर बसून लग्नविधी पार पाडला. मंत्रोच्चार पूर्ण करत हिंदू पद्धतीने नवरा-बायकोला विवाहाच्या बंधनात अडकवले.
सिवनी येथील सुनील उपाध्याय यांचा मुलगा देवांश उपाध्याय हा अमेरिकेत नोकरी करतो. परदेशात त्याची ओळख पुण्यात राहणाऱ्या सुप्रियाशी झाली. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु कामातून वेळ मिळत नसल्याने दोघांना भारतात येऊन लग्न करणे कठीण होते. यावेळी देवांशने सिवनीतील त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
मुलांची अडचण पाहता घरच्यांनी सिवनीतील ६७ वर्षीय पंडित राजेंद्र पांडे यांच्याशी बोलून विवाह मुहूर्त काढला. तारीख ठरली, त्यानंतर पंडित पांडे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून दोघांचे लग्न करण्याचे सांगितले. त्यानंतर उपाध्याय कुटुंब अमेरिकेला पोहचले. त्याठिकाणी लग्नाची सर्व तयारी सुरू झाली. लग्नाच्या दिवशी सिवनीत बसलेले पुजारी राजेंद्र पांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर २१ मे रोजी पंडित राजेंद्र पांडे यांनी देवांश आणि सुप्रियाचा ऑनलाईन विवाह हिंदू पद्धतीने संपन्न केला.
पंडिताला दिली ५१०० अमेरिकन डॉलर दक्षिणा
हा ऑनलाईन विवाह सोहळा करण्यासाठी पंडित राजेंद्र पांडे यांना उपाध्याय दाम्पत्यांनी ५१०० अमेरिकन डॉलर दक्षिणा म्हणून दिली. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ४ लाख २० हजार रुपये होतात. पंडित राजेंद्र पांडे म्हणाले की, अमेरिकेत असलेले वर-वधू यांचा ऑनलाईन विवाह करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. हिंदू प्रथा परंपरेनुसार हे लग्न पार पाडले. नवरदेव देवांश हा मध्य प्रदेशातील सिवनीत तर नवरी मुलगी सुप्रिया महाराष्ट्रातील पुण्यात राहणारी आहे. हे दोघेही नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत राहतात.