खासगी विमानानं हेअर स्टाईलर लंडनहून येतो; दाढी-कटिंगचा खर्च १६ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:44 AM2024-09-11T05:44:41+5:302024-09-11T05:45:27+5:30

ब्रुनेई हा तसा छोटा देश, पण या देशाचे ते सर्वांत शक्तिशाली शासक तर आहेच, पण जगातल्या सर्वाधिक श्रीमंत राजांमध्येही त्यांची गणना केली जाते.

A hair styler arrives from London by private plane; Beard-cutting costs Rs. 16 lakhs | खासगी विमानानं हेअर स्टाईलर लंडनहून येतो; दाढी-कटिंगचा खर्च १६ लाख रुपये

खासगी विमानानं हेअर स्टाईलर लंडनहून येतो; दाढी-कटिंगचा खर्च १६ लाख रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ब्रुनेईला भेट दिली. या दोन्ही देशांमधील संबंध चांगले आहेत आणि जवळपास ४० वर्षे या संबंधांत कोणतेही वितुष्ट आलेले नाही. असं असलं तरी कोणत्याही भारतीय पंतप्रधानानं ब्रुनेइला दिलेली ही पहिलीच भेट होती. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसल अल-बोल्कैया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी ब्रुनेईला गेले होते. त्यांच्या ‘इस्ताना नुरुल इमान’ या महालात पंतप्रधानांचं आलिशान स्वागत झालं. जगातला हा सर्वांत मोठा महाल मानला जातो. 

हे सगळं झालं, पण या निमित्तानं ब्रुनेईचे सुलतान हाजी हसल यांची सध्या फारच चर्चा होते आहे आणि जगभरात त्यांना पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाली आहे. काय असावं याचं कारण ? याचं कारण अर्थातच राजकीय नाही, तर आर्थिक आहे. हे आर्थिक कारणही ब्रुनेईचं नाही, तर खुद्द ब्रुनेईच्या सुलतानांचं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच ते जन्माला आले. त्यांच्याकडची संपत्ती आणि त्यांचं शाही राहणं, वागणं, बोलणं पाहून कोणीही आश्चर्यानं तोंडात बोटं घालावीत! 

सुलतान बोल्कैया हे ब्रुनेईचे २९वे सुलतान आहेत. इंग्रजांनी जगभरात अनेक देशांवर राज्य केले. त्यात ब्रुनेई हा देशदेखील होता. १९८४मध्ये इंग्रजांनी ब्रुनेई सोडल्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत बोल्कैया हेच ब्रुनेईचे सुलतान आहेत आणि त्यांच्याच हातात देशाची संपूर्ण सत्ता आहे. या अर्थानं त्यांनी अनेक विक्रम केले आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी जगात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली आहे. त्यानंतर जास्तीत जास्त काळ सत्तेवर राहण्याचा विक्रम बोल्कैया यांच्या नावावर आहे. सध्या जिवंत असलेल्या व्यक्तींपैकी सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले ‘राजा’ म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. २०१७मध्ये त्यांनी आपल्या सत्तेची ‘गोल्डन ज्युबिली’ साजरी केली होती. 

ब्रुनेई हा तसा छोटा देश, पण या देशाचे ते सर्वांत शक्तिशाली शासक तर आहेच, पण जगातल्या सर्वाधिक श्रीमंत राजांमध्येही त्यांची गणना केली जाते. १९८० पर्यंत ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होते. फोर्ब्सच्या अहवालानुसार २००८मध्ये त्यांची एकूण संपत्ती १.४ लाख कोटी इतकी होती. ब्रुनेईचे सुलतान बनल्यांनतर त्यांच्या संपत्तीत आणखी वाढच होत गेली. देशाची सारी सूत्रं अधिकृतरीत्या त्यांच्या हाती आल्यानंतर त्यांनी ‘इस्ताना नुरुल इमान’ हा महाल तयार केला. या महालाची किंमत किती असावी? तब्बल ५० अब्ज रुपये किमतीचा आलिशान असा हा महाल आहे.

त्यांच्याकडे जगातल्या जवळपास सर्वच प्रकारच्या अत्यंत आलिशान आणि महागड्या अशा कार आहेत. त्या कारची संख्या किती असावी ? त्याचा काही अंदाज तुम्ही करू शकाल ? - पाच, दहा, पंधरा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे?.. आपण कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या म्हणजे तब्बल सात हजार कार त्यांच्याकडे आहेत. जवळपास प्रत्येक ब्रँडच्या कारचा त्यात समावेश आहे. त्यांची किंमत साधारण पाच अब्ज डॉलर्स आहे! 

त्यांचे अजून काय काय शौक आहेत आणि त्यावर ते किती पैसे खर्च करतात, हे ऐकलं तरी सर्वसामान्य माणसांचे डोळे पांढरे होतील. कुठल्याही आलिशान सलूनमध्ये तुम्ही गेलात, तरी त्यावर तुमचा किती खर्च होईल ? ब्रुनेईचे सुलतान बोल्कैया यांच्या नुसत्या दाढी-कटिंगचा खर्चच महिन्याला १६ लाख रुपये आहे. देशातल्या कोणत्याच सलूनवाल्याकडून ते दाढी-कटिंग करवून घेत नाहीत. आपल्या देशातील ‘देशी स्टाईल’ त्यांना आवडतही नाही. त्यांचा हेअर स्टाईलर लंडनला राहतो. दाढी-कटिंगसाठी महिन्यातून दोन वेळा ते त्याला आमंत्रण पाठवितात. चार्टड प्लेननं तो येतो. तो आल्यानंतरच आपल्याला हवे तसे केस ते सेट करून घेतात. बोल्कैया यांचा असा हा आलिशान थाट आहे.

त्यांच्याकडे किती दौलत आहे, हे त्यांनाही माहीत नसावं. त्यात भरीस भर म्हणजे त्यांच्याकडे पैसा फक्त येतोय. त्याला वाटा फुटतात, त्या फक्त त्यांच्या अशा छानछोकीवर! सरकारी सगळ्या सुविधा त्यांना मिळतात. चाेवीस तास या सेवा त्यांच्या पायाशी असतात, शिवाय ब्रुनेईचे सुलतान असल्यानं त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.

नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध 
ब्रुनेईची लोकसंख्या साधारण ४.८२ लाख आहे. त्यातील फक्त बोटावर मोजता येण्याइतक्याच लोकांना त्यांच्या महालात प्रवेश आहे. एवढा छोटा देश असला तरी नैसर्गिक साधनसंपत्तीनं तो समृद्ध आहे. भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करून आपल्याकडील नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करतो आहे. भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात २७० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. याशिवाय स्पेस टेक्नोलॉजी, आरोग्य या क्षेत्रातही दोन्ही देशांत करार झाले आहेत.

Web Title: A hair styler arrives from London by private plane; Beard-cutting costs Rs. 16 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.