पृथ्वी अधिक वेगाने फिरू लागल्यास संकटांची मालिका, लागला २४ तासांपेक्षा कमी कालावधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:13 AM2022-08-02T11:13:21+5:302022-08-02T11:13:41+5:30
पहिल्यांदाच स्वत:भोवती फिरण्यासाठी घेतला २४ तासांपेक्षा कमी वेळ.
पृथ्वीचे तिच्या नेहमीच्या वेगापेक्षा अधिक गतीने भ्रमण सुरू आहे. २९ जुलै या कमी कालावधीच्या दिवशी पृथ्वीने स्वत:भोवती फिरण्यासाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ घेतला.
त्या दिवशी पृथ्वीने स्वत:भोवती फिरण्यासाठी घेतलेला वेळ हा २४ तासांपेक्षा १.५९ मिलीसेकंदांनी कमी होता. हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. २०२० साली पृथ्वीतलावर सर्वात लहान महिना अवतरला होता. १९६० सालापासून इतका लघु स्वरूपाचा महिना आला नव्हता.
५० वर्षांत अनेकदा लहान दिवस उगवणार
२०२० साली १९ जुलै हा सर्वात कमी कालावधीचा दिवस होता. त्यावेळी पृथ्वीने स्वत:भोवती फेरी मारण्यासाठी घेतलेला वेळ हा २४ तासांपेक्षा १.४७ मिलीसेकंदांनी कमी होता.
याच्या पुढच्या वर्षी पृथ्वी स्वत:भोवती अधिक वेगाने फिरत राहिली. पण तिने कोणतेही विक्रम मोडले नाहीत. मात्र येत्या ५० वर्षांत अनेकदा लहान दिवस उगवणार असून त्याची सुरुवात आता झाली आहे असे शास्त्रज्ञांना वाटते.
काय होऊ शकतो परिणाम
पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग वाढला तर एका दिवसाच्या तासांचा कालावधी कमी होईल. त्याचा परिणाम जगभरातील घड्याळे व तंत्रज्ञानविषयक गोष्टींवर होऊ शकतो. सेकंदांचा हिशेबही त्यामुळे बिघडू शकतो.
पृथ्वी स्वत:भोवती वेगाने का फिरते?
पृथ्वी स्वत:भोवती फिरण्याच्या वेगात जो फरक पडतो त्यामागचे कारण अद्यापही अज्ञात आहे. पृथ्वीवरील हिमनद्या वितळल्याने या ग्रहाचे वस्तुमान काही प्रमाणात कमी होते.
पृथ्वीच्या भूगर्भात अनेक हालचाली होत असतात. अशा काही कारणांमुळे पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याचा वेग कमी जास्त होत असावा अशी शक्यता काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.