एका मेंढीची किंमत दोन कोटी रुपये! असं काय विशेष आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 09:48 AM2022-10-13T09:48:42+5:302022-10-13T09:49:03+5:30

ऑस्ट्रेलियातील चार जणांनी मिळून ही मेंढी विकत घेतली आहे. पण या मेंढीमध्ये असं काय विशेष आहे, ज्यामुळे ही मेंढी इतक्या भल्यामोठ्या किमतीत विकली जावी?

A sheep costs two crore rupees! | एका मेंढीची किंमत दोन कोटी रुपये! असं काय विशेष आहे...

एका मेंढीची किंमत दोन कोटी रुपये! असं काय विशेष आहे...

googlenewsNext

पाळीव प्राण्यांची अनेक जणांना खूप हौस असते. गाय, बैल, म्हैस, कुत्रा, मांजर, घोडा.. असे अनेक प्राणी आपण पाळतो. अर्थातच हे प्राणी पाळण्याची प्रत्येकाची कारणं आणि हेतू वेगवेगळे असतात. कोणी पैसा मिळविण्यासाठी, शेतीला मदत म्हणून, घराची राखण म्हणून, कोणी व्यवसाय म्हणून, तर कोणी निव्वळ हौस, आवड म्हणून असे प्राणी पाळतात. काही जणांची ही हौस वाघ, सिंह, चित्ते, विषारी साप, अजगर.. अशा खतरनाक प्राण्यांपर्यंतही जाऊन पोहोचते. काही शौकिन तर प्राण्यांसाठी इतके ‘वेडे’ असतात, की त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. 

शेतकरी शेळ्या, मेंढ्या असे प्राणी पाळतात. पण पूरक उत्पन्न म्हणूनच त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. या प्राण्यांची किंमतही तशी माफक असते. पण एका मेंढीनं (खरं तर हा मेंढा आहे.) नुकताच एक जागतिक विक्रम केला आहे. ही मेंढी केवढ्याला विकली जावी? ऑस्ट्रेलियातील ही विशेष प्रजातीची मेंढी नुकतीच तब्बल दोन लाख ४० हजार डॉलर्सना (सुमारे दोन कोटी रुपये) विकली गेली. या मेंढीनं इतक्या मोठ्या किमतीत विक्रीचा जागतिक विक्रम केला आहे. गेल्या वर्षीही एक मेंढी ७५ हजार डॉलर्सना विकली गेली होती. त्या तुलनेत यंदाची रक्कम मात्र फारच मोठी आहे. 

ऑस्ट्रेलियातील चार जणांनी मिळून ही मेंढी विकत घेतली आहे. पण या मेंढीमध्ये असं काय विशेष आहे, ज्यामुळे ही मेंढी इतक्या भल्यामोठ्या किमतीत विकली जावी?
ज्या चार जणांनी ही मेंढी विकत घेतली, त्यातील एकाचं नाव आहे स्टीव्ह पेड्रीक. त्यांनी या मेंढीला ‘एलाइट शीप’ असे नाव दिले आहे. स्टीव्हचं म्हणणं आहे, ही मेंढी खरोखरच अद्भुत आणि विशेष आहे. अतिशय दुर्मीळ अशा प्रजातीतील ही मेंढी आहे. जगात या जातीच्या फारच थोड्या मेंढ्या शिल्लक आहेत. एवढ्या प्रचंड किमतीत आम्ही ही मेंढी खरेदी केल्याचं पाहून आश्चर्यानं अनेकांची बोटं तोंडात गेली, पण या मेंढीला इतके पैसे आम्ही मोजले ते काही उगाच नाही. याच मेंढीच्या माध्यमातून या प्रजातीच्या मेंढ्यांचं उत्पादन आम्ही करू. त्यामुळे या विशेष प्रजातीच्या मेंढ्यांचं संरक्षण तर होईलच, शिवाय त्यातून मोठा पैसाही आम्हाला मिळू शकतो. हा काही घरघालू धंदा आम्ही केलेला नाही. या प्रजातीच्या मेंढ्यांचं जतन आणि संवर्धन हा आमचा प्रधान हेतू आहे, पण तो आम्हाला पैसाही मिळवून देईल हे नक्की. 
या मेंढ्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर फर नसते. विशेष म्हणजे केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात मेंढ्यांच्या अंगावरील फर काढणाऱ्या कारागिरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे. त्यातील तज्ज्ञ लोकांची संख्या झपाट्यानं कमी होते आहे. त्यामुळे मेंढ्यांच्या अंगावरील फर काढणं हा प्रकार दिवसेंदिवस खूपच महागडा होतो आहे. मेंढ्यांच्या अंगावरील

फरपासून अनेक उपयुक्त उत्पादनं तयार 
होत असली, तरी अनेकांसाठी तो आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो आहे. त्यामुळे ज्या मेंढ्यांच्या अंगावर कमी प्रमाणात फर असते, अशाच मेंढ्या आता जास्त प्रमाणात पसंत केल्या जातात. 
ही जी पांढरी मेंढी नुकतीच दोन कोटी रुपयांमध्ये विकली गेली, त्या मेंढीच्या मालकालाही आपल्या मेंढीला इतकी किंमत मिळाल्याचं पाहून जणू फिट यायचीच बाकी राहिली. ग्रॅहम गिलमोर हे त्याचं नाव. तो म्हणतो, माझ्याकडची मेंढी विशेष जातीची आहे, हे मलाही माहीत होतं, पण तिला इतकी किंमत मिळेल, हे माझ्या कल्पनेच्याही बाहेर होतं. मी जेव्हा पहिल्यांदा ही किंमत ऐकली, तेव्हा मलाही वाटलं, ते माझी फिरकी घेताहेत, पण ते सत्य आहे, हे समजल्यावर माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही. या पैशांचा उपयोग मी माझ्या कुटुंबाला गरिबीतून वर आणण्यासाठी करेन. 
ऑस्ट्रेलियातील मेंढीपालनाचा व्यवसाय सध्या फारच तेजीत आहे. त्यात या मेंढीनं ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणं घेतल्यानं हा व्यवसाय आणखी तेजीत येईल असं म्हटलं जात आहे. 

घोडा, गाय आणि कुत्र्याची किंमत!
जगात आतापर्यंत अनेक प्राण्यांनी आपल्याला खरोखरच फिट आणि चक्कर येईल इतकी प्रचंड किंमत मिळवलेली आहे. त्यातलंच एक नाव आहे ग्रीन मंकी. दुर्मीळ प्रजातीचा अतिशय वेगवान असा हा घोडा आहे. हा घोडा तब्बल एक अब्ज रुपयांना विकला गेला होता. मिस मिस्सी नावाची एक गाय साडेआठ कोटी रुपयांना विकली गेली होती. सर्वसाधारण गायींच्या तुलनेत ही गाय पन्नास टक्के जास्त दूध देते. सिंहासारख्या दिसणाऱ्या एका तिबेटी कुत्र्याची किंमत पाच कोटी रुपये आहे. चित्त्यांच्या टोळीला एकट्यानं भिडण्याची हिंमत हा कुत्रा दाखवतो!

Web Title: A sheep costs two crore rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.