ना पंडित, ना फेरे, ना विधी... राज्यघटनेच्या साक्षीने पार पडले अनोखे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:34 AM2023-01-18T10:34:16+5:302023-01-18T10:35:35+5:30

१२ वर्षांच्या अफेअरनंतर अडकले लग्नबंधनात

A unique wedding took place with the witness of the constitution | ना पंडित, ना फेरे, ना विधी... राज्यघटनेच्या साक्षीने पार पडले अनोखे लग्न!

ना पंडित, ना फेरे, ना विधी... राज्यघटनेच्या साक्षीने पार पडले अनोखे लग्न!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बैतूल : भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मध्य प्रदेशातील एक वकील आणि शिक्षक यांनी अनोखा विवाह केला. राज्यघटनेची प्रत हातात घेऊन त्याची प्रस्तावना वाचून दर्शन आणि राजश्री यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. बैतूलच्या कोठीबाजार येथील वकील दर्शन बुंदेला आणि इटारसी रोड येथील रहिवासी राजश्री अहिरे यांचा रविवारी सायंकाळी बडोरा येथील मंगलकार्यालयात विवाह पार पडला. पंडित नाही, फेरे नाही की, इतर कोणतेही विधीही या लग्नात पार पडले नाहीत. दोघांनी प्रथम नोंदणीकृत विवाह केला.

निमंत्रण पत्रिकेवरही घटनेचा उल्लेख

“कलम २१ नुसार, ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराखाली लग्न करत आहेत. तुम्हीही घटनेच्या कलम १९ (आय) (बी) नुसार शांततेने एकत्र येण्याचा अधिकार वापरून लग्नाला या आणि त्यांना आशीर्वाद द्या”, असे लग्नपत्रिकेवर छापले होते.

१२ वर्षांच्या अफेअरनंतर लग्न

- दर्शन बैतूलच्या जिल्हा न्यायालयात वकील आहे, तर राजश्री हरदा जिल्ह्यातील एक्सलन्स स्कूलमध्ये उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षिका आहे. दर्शन आणि राजश्रीची मैत्री १२ वर्षांपूर्वी कॉलेजमध्येच झाली. 
- तेव्हापासून दोघांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १२ वर्षांनंतर अखेर दोघे विवाहबंधनात अडकले. आंतरजातीय प्रेमविवाह दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने झाला.

जातीच्या आधारावर भेदभाव

“देशात जातीची मुळे खोलवर पसरली आहेत. घटनेचे कलम २१ जे आम्हाला निवडण्याचा अधिकार देते. याच अधिकाराचा वापर करत आम्ही ही प्रस्तावना वाचून लग्न केले आणि एकमेकांचे जीवनसाथी बनलो”, असे दाम्पत्याने म्हटले.

Web Title: A unique wedding took place with the witness of the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.