ना फोन, ना रिल्स, ना कुणाशी बोलली; ८ तास बेडवर शांत बसलेल्या महिलेने १ लाख जिंकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 11:48 AM2024-12-10T11:48:02+5:302024-12-10T11:49:16+5:30
या महिलेने गाढ झोप घेतली नाही. त्याशिवाय अधिकचा वेळ बेडवर घालवला, खूप कमी वेळा तिने टॉयलेट ब्रेक घेतला असं आयोजकांनी सांगितले.
सध्याच्या धावत्या युगात विना मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सशिवाय कुणी क्षणभरही राहू शकत नाही. माणसाने प्रत्येक सेकंदाला महत्त्व दिले आहे परंतु विचार करा, जर एखाद्याने अशी स्पर्धा भरवली जिथं तुम्हाला मोबाईलशिवाय आणि कुठलेही अन्य गॅझेट न वापरता ८ तास वेळ घालवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला बक्षिसही मिळेल तर काय कराल?
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट रिपोर्टनुसार, २९ नोव्हेंबरला चीनच्या चोंगाक्विन नगरपालिकेकडून अशी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात स्पर्धकांना विना मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड किंवा अन्य कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट न वापरता ८ तास वेळ घालवायचा होता. या काळात फक्त टॉयलेट ब्रेकसाठी बेड सोडण्याची परवानगी होती तेही ५ मिनिटांसाठी होते.
जिंकण्यासाठी काय होती अट?
या स्पर्धेत १० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात एका मॉलच्या आत बेडिंग स्टोर बनवला होता. अट अशी होती की, स्पर्धक गाढ झोपू शकत नाही, ना त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव दिसावा. त्यांच्या मनगटावर पट्टे बांधले गेले होते, ज्यामुळे त्यांचा ताण आणि चिंता मोजली जाणार होती. स्पर्धेवेळी ९ लोक एक एक करून बाहेर गेले परंतु एका महिलेने जबरदस्त कामगिरी केली. या महिलेने १०० पैकी ८८.९९ गुण मिळवून विजय मिळवला. विजेत्या महिलेला १० हजार युआन म्हणजे १.२० लाख रुपये रोकड बक्षिस देण्यात आले.
या महिलेने गाढ झोप घेतली नाही. त्याशिवाय अधिकचा वेळ बेडवर घालवला, खूप कमी वेळा तिने टॉयलेट ब्रेक घेतला असं आयोजकांनी सांगितले. तर मी माझ्या रिकाम्या वेळेत मुलांना शिकवते, मोबाईल आणि अन्य गॅझेटचा कमीत कमी वापर करण्याचा मी नेहमी प्रयत्न करते असं विजेत्या महिलेने माध्यमांना सांगितले. या अनोख्या स्पर्धेचे आयोजन माणसांना कुठल्याही तंत्रज्ञानाशिवाय वेळ घालवता यायला हवा यासाठी केले होते.
दरम्यान, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा चीनमध्ये मोबाईल आणि अन्य उपकरणे याशिवाय आयुष्य जगायला शिकवले जाते. अनेकदा अशा मोहिम सुरू असतात. वर्षाच्या सुरुवातीला एक चीनी विद्यार्थ्याने जो यूकेमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे त्याने कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटशिवाय १३४ दिवस चीनच्या २४ मुख्य भागाची भटकंती केली होती. दक्षिण कोरियातही २०१४ साली अशी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्पर्धकांना केवळ एक अट होती ती म्हणजे स्पर्धकांनी काही करू नये आणि झोपायचंही नाही.