४ लाखांचं शर्ट, ८० हजारांचे मोजे…कोट खरेदी करण्यात खर्च करावी लागेल वर्षाची सॅलरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:43 PM2023-01-04T13:43:42+5:302023-01-04T13:44:09+5:30
पाहा काय आहे यात इतकं खास?
तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर किती रुपायांना सॉक्स घेत असाल? कदाचित 50, 100 किंवा 1000 रुपये... तुम्हाला विकुना फॅब्रिक माहितीये? विकुना फॅब्रिकच्या मोज्यांची किंमत पाहूनच सर्वांचे डोळे पांढरे पडतील. जितकी महिन्याची सॅलरी असेल किंवा त्यापेक्षाही जास्तच तितकी या फॅब्रिकच्या मोज्यांची किंमत आहे. होय, विकुना फॅब्रिकच्या सॉक्सची किंमत 80,000 रुपयांपर्यंत आहे. शर्टची किंमत सांगितली तर पायाखालची जमीन सरकेल. या फॅब्रिकपासून बनवलेले स्कार्फ 5 ते 5.5 लाख रुपयांना मिळतात. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या फॅब्रिकची खासियत जाणून घेणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.
जगातील सर्वात महागडं फॅब्रिक
जगातील सर्वात महागडं फॅब्रिक म्हणजे विकुना. हे लक्झरी आणि सर्वात महाग फॅब्रिकमध्ये गणले जाते. त्यातून बनवलेले कपडे विकत घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. लोरो पियाना या इटालियन कंपनीच्या वेबसाइटवर विकुला फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांची विक्री किंमत पाहिली तर एका मोज्यांच्या जोडीची किंमत 80 हजार रुपये आहे, तर शर्ट 4 ते 5 लाख रुपयांना विकला जात आहे.
कपड्यांचीही किंमत अधिक
लोरो पियानामध्ये विकुना फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळतील. या कपड्यांची किंमत बघितली तर 80,000 रुपये किमतीचे मोजे, 4,23,000 रुपये किमतीचे शर्ट आणि 9,11,000 रुपये किमतीचे पोलो नेक टी-शर्ट आहेत. विकुना फॅब्रिकच्या पॅंटची किंमत 8 लाख 97 हजार रुपये आणि कोट 11 लाख 44 हजार रुपयांना मिळेल. दुसरीकडे, तुम्ही मॉलमध्ये जे स्कार्फ 500 ते 1,000 रुपयांना खरेदी करता, ते तुम्हाला तिथे 5 लाख रुपयांना मिळतील.
का आहे इतकं महाग?
विकुना फॅब्रिक विशेष उंटाच्या केसांपासून तयार केले जाते. हे लहान आकाराचे उंट दक्षिण अमेरिकेतील एका विशेष भागात आढळतात. उंटांची ही प्रजाती नामशेष होत आहे. 1960 मध्येच त्यांना दुर्मिळ प्रजाती घोषित करण्यात आली होती. या उंटांचे संगोपन आणि पाळण्याचे नियम अतिशय कडक आहेत. विकुना हे अत्यंत बारीक, हलकी आणि उबदार असते. विकुनाची जाडी 12 ते 14 मायक्रॉन असते. हे कापड खूप गरम असतात, त्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते. विकुनापासून बनवलेला कोट बनवण्यासाठी सुमारे 35 उंटांची लोकर काढावी लागते. त्यानुसार, आपण त्याचे किंमतीचा अंदाज लावू शकता. इटलीच्या लोरो पियाना कंपनीने विकुनासाठी खास अभयारण्य बनवले आहे. पेरूजवळ 5,000 एकरवर उंटांचं पालन केले जाते. त्यांची विशेष काळजी घेतली जाते.