फणसाची चोरी पडली भारी; वकिलाला घडली तुरुंगवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 01:53 PM2019-04-04T13:53:59+5:302019-04-04T13:57:31+5:30
न्यायालय परिसरातला फणस महागात पडला
लखनऊ: न्यायालयाच्या आवारात असलेल्या झाडावरुन फणस तोडणं एका वकिलाला चांगलंच महागात पडलं. चोरीचा आरोप सिद्ध झाल्यानं त्याला अटक करण्यात आली. या वकिलाची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली. बस्ती जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला.
बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरात एक फणसाचं झाड आहे. सकाळच्या सुमारास न्यायालय परिसरात आलेल्या वकील नीरज चौधरी यांनी झाडावरुन एक फणस तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शिपायानं विरोध करण्याचा प्रयत्न केला. याचा चौधरी यांना राग आला. त्यांनी संतापाच्या भरात शिपायाला मारहाण केली. त्यानंतर शिपायानं या प्रकाराची माहिती 100 नंबरवर फोन करुन पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नीरज चौधरी यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत पोलिसांना एक फणस सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नीरज यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायमूर्तींनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या नीरज बस्ती तुरुंगात आहेत. बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरातील फणस सर्रास चोरीला जात असल्यानं असे प्रकार रोखण्यासाठी शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.