वय २१ वर्षे, उंची २३ इंच
By admin | Published: March 27, 2017 01:19 AM2017-03-27T01:19:29+5:302017-03-27T01:19:29+5:30
पंजाबमधील २१ वर्षांचा एक मुलगा सध्या चर्चेत आहे. त्याला पाहण्यासाठी दुरून लोक येतात आणि ईश्वराचे रूप मानून
लुधियाना : पंजाबमधील २१ वर्षांचा एक मुलगा सध्या चर्चेत आहे. त्याला पाहण्यासाठी दुरून लोक येतात आणि ईश्वराचे रूप मानून त्याची पूजा करतात. या मुलाची उंची तो सहा महिन्यांचा असताना जेवढी होती तेवढीच आजही आहे. हा जगातील सर्वात बुटका मुलगा असल्याचा लोकांचा दावा आहे. या मुलाची उंची केवळ २३ इंच असून, त्याचे वजनही सहा महिन्यांच्या मुलाएवढेच आहे.
पंजाबच्या या मुलाचे नाव मनप्रीतसिंग आहे. जन्मावेळी तो सामान्य मुलांसारखाच होता. मात्र, सहा महिन्यांनंतर त्याची वाढ बंद झाली, असे त्याचे आई-वडील मनजीत कौर आणि जगतारसिंग यांनी सांगितले. मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. काही डॉक्टरांना दाखविल्यानंतर मनप्रीतला थॉयराईडचा आजार असल्याचे समजले. मात्र, त्यावरील उपचार खूपच महागडे होते. त्यामुळे त्याचा आजार कायम राहिला, असे ते म्हणाले. या आजारामुळे मनप्रीत ना चालू शकतो ना कोणाला काही बोलू शकतो. तीन वर्षांचा असेपर्यंत तो हळूहळू चालत होता. मात्र, दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत गेली आणि आज तो या अवस्थेला पोहोचला आहे. आमचे नातेवाईक ईश्वराचा अंश म्हणून त्याची पूजा करतात, असे त्याच्या आईने सांगितले.