अनोखी भक्ती! श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळला; पुजारी रडत रुग्णालयात पोहोचला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:41 AM2021-11-20T11:41:50+5:302021-11-20T11:44:25+5:30
श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालताना मूर्ती हातातून निसटली; हात निखळला
आग्रा: उत्तर प्रदेशात शुक्रवारी एक अनोखी घटना घडली. शहरातील जिल्हा रुग्णालयात एक श्रीकृष्ण भक्त हात निखळलेली मूर्ती घेऊन पोहोचला. मूर्तीचा हात निखळला आहे. त्यामुळे पट्टी बांधून देण्यात यावी, अशी विनंती भक्तानं रुग्णालयातील डॉक्टरांना केली. त्यानंतर डॉक्टरांनी श्रीकृष्ण नावानं रुग्णाची नोंद करत मूर्तीच्या निखळलेल्या हातावर पट्टी बांधली.
श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन एक पुजारी रुग्णालयात रडत रडत रुग्णालयात पोहोचला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सकाळी ९ वाजता पुजारी रुग्णालयात पोहोचला. श्रीकृष्णाच्या मूर्तीचा निखळलेला हात पुन्हा जोडून देण्यात यावा असा हट्ट पुजाऱ्यानं धरला. सकाळी मूर्तीला स्नान घालत असताना हात निखळल्याचं पुजारी लेखी सिंहनं डॉक्टरांना सांगितलं.
'सकाळी मूर्तीला स्नान घालत असताना मूर्ती माझ्या हातून निसटली आणि तिचा हात निखळला. मी कृष्णभक्त असल्यानं मला त्याबद्दल खूप वाईट वाटलं. त्यामुळेच मी मूर्ती घेऊन जिल्हा रुग्णालयात गेलो,' असं लेखी सिंह यांनी सांगितलं. लेखी सिंह गेली ३० वर्षे अर्जुन नगरातील पथवारी मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत. मी रुग्णालयात जाऊन मूर्तीला हात जोडून देण्याची, पट्टी बांधण्याची विनंती केली. मात्र कोणीही गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. मी आतून कोलमडलो होतो. त्यामुळे अश्रू अनावर झाले, असं लेखी सिंह म्हणाले.
एक पुजारी कृष्णाची हात निखळलेली मूर्ती घेऊन आल्याची माहिती रुग्णालयाकडून आपल्याला देण्यात आल्याचं जिल्हा रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. अशोक कुमार अग्रवाल यांनी सांगितलं. 'मूर्तीवर उपचार करा असं म्हणत पुजारी रडत होता. पुजाऱ्याच्या भावना पाहून आम्ही मूर्तीची श्रीकृष्ण म्हणून नोंद केली. पुजाऱ्याच्या समाधानासाठी आम्ही मूर्तीवर पट्टी बांधली,' अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.