पाचशे पुस्तके दान करणारे अवलिया शेख समद
By Admin | Published: July 6, 2017 10:45 PM2017-07-06T22:45:42+5:302017-07-06T22:47:57+5:30
मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी शेख अब्दुल समद यांनी आयुष्यभर एक-एक करून संग्रहित केलेली पाचशे
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 06 - मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी शेख अब्दुल समद यांनी आयुष्यभर एक-एक करून संग्रहित केलेली पाचशे पुस्तके निवृत्तीनंतर महाविद्यालयास दान केली. यातून पदवी व संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठी मदत होणार आहे. पाचशे पुस्तके दान करणाºया या अवलियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ शेख समद यांनी महाविद्यालयात सेवा बजावली. घराची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने दहावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरी करण्याची वेळ आली. त्यामुळे पुढील शिक्षण थांबले. याची उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी स्वत: पुस्तके खरेदी करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यास सुरू केले. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र विषयाची पुस्तके त्यांनी खरेदी केली. अभ्यासानंतर ही पुस्तके प्रामाणिकपणे विद्यार्थी परत करायचे. या पुस्तकांच्या किमती १०० रुपयांपासून तर ९०० रुपयांपर्यंत आहेत. ही पुस्तके विकायला काढली असती तर त्यांना लाखो रुपये मिळाले असते; परंतु या अवलियाने तसे न करता ते दान करून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयालाही अनेक उपयुक्त पुस्तके दान केली आहेत. स्वत:चे शिक्षण अधिक झालेले नसले तरी शेख समद यांनी स्वत:च्या मुलांना व इतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. यासाठी त्यांना अनेकांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा पद्मश्री फातेमा रफिक झकेरिया आणि प्राचार्य मगदूम फारुकी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.