बाबो! या मुलाच्या हाती मोबाईल देताच आपोआप डिलीट होतोय सर्व डेटा; पाहण्यासाठी तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 04:33 PM2021-09-21T16:33:11+5:302021-09-21T16:35:38+5:30
मुलाच्या हाती मोबाईल जाताच संपूर्ण डेटा डिलीट; पालकांसह नातेवाईक चिंतेत
अलीगढ: मोबाईलचं कोणतंही बटण दाबवल्याशिवाय, फोन फॅक्टरी रिसेट केल्याशिवाय त्यातला संपूर्ण डेटा जाणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. पण अलीगढमधल्या एका मुलाच्या हातात मोबाईल गेल्यावर तो संपूर्णपणे रिसेट होतो, त्यातला सगळा डेटा जातो. फोनमधले मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि सगळ्या फाईल्स डिलीट होतात. अनेकांना ही गोष्ट पचनी पडणार नाही. मात्र अलीगढमधला एक मुलगा सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे.
अलीगढमध्ये वास्तव्यास असलेल्या गौरव अग्रवाल यांचा मुलगा अस्तित्वसोबत घडणाऱ्या घटना चर्चेचा विषय ठरत आहेत. अस्तित्वच्या घराबाहेर लोकांची रांग लागते. अस्तित्वच्या हाती मोबाईल देऊन अनेक जण त्याचा व्हिडीओ चित्रित करतात. अस्तित्वकडे मोबाईल दिल्यावर खरंच त्याच्यातला सगळा डेटा डिलीट होतो का, अशी उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेक जण थेट चमत्कार पाहायला अस्तित्वच्या घरी येतात.
मेन विल बी मेन! जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण?
अस्तित्वच्या हातात मोबाईल दिल्यावर तो रिसेट होत असल्यानं अनेकांना धक्का बसला. अस्तित्वच्या वडिलांनी त्याच्या संपूर्ण शरीराची वैद्यकीय चाचणी करून घेतली. मात्र अहवालात काहीच वावगं आढळून आलं नाही. अस्तित्वच्या हाती मोबाईल देताच त्यातील संपूर्ण डेटा गायब होत असल्याचं १२ मे रोजी त्याच्या आई वडिलांच्या सर्वप्रथम लक्षात आलं.
१२ मे रोजी अस्तित्वनं कुटुंबातल्या एका सदस्याचा मोबाईल घेतला होता. त्या मोबाईलमधला डेटा अचानक गायब झाला. त्यामुळे आई वडील अस्तित्वला ओरडले. डेटा डीलिट झाल्याची तक्रार घेऊन कुटुंबीय मोबाईलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेले. मात्र तिथे मोबाईल व्यवस्थित होता. २२ ऑगस्टलादेखील याच घटनेची पुनरावृत्ती झाली. त्यावेळी अस्तित्व त्याच्या आईसोबत ननिहालला गेला होता. रक्षाबंधनादिवशीच त्याच्या आईच्या फोनमधील डेटा गायब झाला.
अस्तित्वच्या जवळ मोबाईल नेल्यानंतर त्यातला डेटा डिलीट होत असल्याचं नंतर कुटुंबाच्या लक्षात आलं. त्यांनी अस्तित्वची वैद्यकीय चाचणी घेतली. मात्र अहवाल अगदी सामान्य होता. डॉक्टरांनी इलेक्ट्रॉनिक बीपी मशीनच्या मदतीनं रक्तदाब तपासण्याचा प्रयत्न केला. पण मशीन एरर दाखवू लागली. त्यामुळे रक्तदाब तपासता आला नाही. अस्तित्वला शरीरात कोणतेही बदल जाणवत नाहीत. अस्तित्वच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना त्याच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे.