बाबो! रिटायरमेंटच्या दिवशी घरी जाण्यासाठी शिक्षकाने बुक केलं चक्क हेलिकॉप्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 04:06 PM2019-08-30T16:06:52+5:302019-08-30T16:12:38+5:30
जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांच्या वेगळ्या वागण्यामुळे ते नेहमी चर्चेतही राहतात. असेच राजस्थानमधील एक शिक्षक एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत.
(Image Credit : www.forbes.com)(सांकेतिक फोटो)
जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांच्या वेगळ्या वागण्यामुळे ते नेहमी चर्चेतही राहतात. असेच राजस्थानमधील एक शिक्षक एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. आता म्हणाल की, काय केलं या शिक्षकाने? तर यांनी रिटायरमेंटच्या दिवशी हेलिकॉप्टरने घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अलवर जिल्ह्याच्या लक्ष्मणगढचे राहणारे रमेश चंद्र मीणा ३१ ऑगस्टला रिटायर होणार आहेत. हा नोकरीचा शेवटचा नेहमीसाठी लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी वेगळीच आयडिया लावली आहे. या दिवशी शाळेतून घरी जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बुक केलं आहे. राजस्थानमध्ये घडणारी ही अशाप्रकारची पहिलीच घटना असेल.
माध्यमिक विद्यालय सौराईमध्ये सामाजिक विज्ञान शिकवणारे मीणा यांनी शाळेपासून साधारण २२ किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या गावात जाण्यासाठी हेलिकॉप्टर बूक केलं आहे. त्यांना सर्वच संबंधी विभागांची परवानगी देखील मिळाली आहे. हेलिकॉप्टरने घरी जाण्यासाठी त्यांना साधारण तीन लख ७० हजार रूपये खर्च आला आहे. हे पैसे त्यांनी जमाही केले आहेत.
३१ ऑगस्टला हेलिकॉप्टर दिल्लीहून उड्डाण घेईल आणि दुपारी १ वाजता सौराई शाळेत पोहोचेल. हेलिकॉप्टर पोहोचल्यानंतर मीणा या हेलिकॉप्टरमध्ये सवार होऊन मलावली या त्यांच्या गावी पोहोचतील. मीणा यांची त्यांच्या पत्नीला हेलिकॉप्टरमध्ये बसवण्याची इच्छा आहे, यासाठीच त्यांनी हे पाऊल उचललं आहे. मीणा यांचा एका मुलगा शिक्षक तर दुसरा मुलगा एफसीआयमध्ये क्वालिटी इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहे.