अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:44 PM2024-11-08T15:44:21+5:302024-11-08T15:47:37+5:30
Bryan Johnson anti ageing diet: 'एज रिव्हर्स डाएट' अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर त्याने काही दावे केले आहेत
Bryan Johnson anti ageing diet: अमेरिकन उद्योगपती आणि बायोटेक फर्मचे सीईओ ब्रायन जॉन्सन हे अब्जाधीश आहेत. पण ते सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून ते चिरतरुण राहण्यासाठी खास गोष्ट करत आहेत. दिवसातून १८ तास उपवास करुन ते स्वत:ला तरुण ठेवत असल्याचा त्यांचा दावा आहे. वयाच्या ४७ व्या वर्षीही ते एखाद्या १८ वर्षांच्या तरुणासारखे दिसत आहेत, असा त्यांचा दावा आहे. 'एज रिव्हर्स डाएट' अशा प्रकारच्या आहाराच्या आधारावर ते असा दावा करत आहेत. या डाएटसाठी ते दरवर्षी सुमारे २ दशलक्ष डॉलर्स (१६ कोटी रुपये) खर्च करतात अशीही माहिती आहे.
रोज १८ तास उपवास करतात
बायोटेक फर्मचे सीईओ ब्रायन जॉन्सन यांनी अलीकडेच YouTuber रणवीर अल्लाबदियासोबतच्या पॉडकास्टमध्ये आले होते. या पॉडकास्ट शो मध्ये त्यांनी खुलासा केला की ते त्याच्या दैनंदिन आहारावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतात आणि सर्व प्रकारचा आहार केवळ ६ तासांच्या वेळेतच खातात. ते दररोज १८ तास उपवास करतात आणि त्यांचे शेवटचे जेवण सकाळी ११ वाजता होते. त्यांचे हे डाएट शरीराला चांगल्या पेशी आणि इतर केमिकलची निर्मिती करण्यासाठी कार्य मदत करतात आणि शांत झोप लागण्यासाठी फायदेशीर ठरते.
आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश?
ब्रायन यांनी सांगितले की ते त्यांच्या आहारात प्रामुख्याने कडधान्ये, भाज्या, बेरी, नट (अक्रोड, बदाम), बिया (चिया, अंबाडी) आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरतात. या आहारात भरपूर पोषण आणि अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यांच्या मते, हे पदार्थ वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. या डाएटमधील काही घटक हे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. मात्र हे डाएट फॉलो करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. पण अब्जाधीश उद्योगपतीने मात्र या डाएटचा उपयोग झाल्याचे सांगितले आहे.