'या' ठिकाणी खाताना स्मार्टफोन टाळा, मिळेल मोफत पिझ्झा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 05:11 PM2019-06-11T17:11:50+5:302019-06-11T17:16:30+5:30
जेवण करताना स्मार्टफोनचा वापर टाळण्यासाठी अमेरिकेतील एका रेस्तराँने अनोखा निर्णय घेतला आहे.
मुंबई : स्मार्टफोनचा वापर हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे. फिरायला जाताना, खाताना सतत आपण बाकीच्या कामापेक्षा स्मार्टफोनला जास्त महत्व देतो. स्मार्टफोनवरुन अनेकवेळा घरातून ओरडा मिळतो. दरम्यान, खाताना स्मार्टफोनचा वापर टाळण्यासाठी अमेरिकेतील एका रेस्तराँने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रेस्तराँमध्ये खाताना फोनचा वापर न करणाऱ्यांना मोफत पिझ्झा देण्याचे जाहीर केले आहे.
अमेरिकेतील फॉक्स वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियामधील एका रेस्तराँने आपल्या ग्राहकांना स्मार्टफोनचा वापरण्यापेक्षा एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी करी पिझ्झा कंपनीने 'टॉक टू एव्हरीवन डिस्काउंट'नुसार कमीत-कमी चार जणांच्या समूहाला मोफत पिझ्झा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, खाताना स्मार्टफोनचा वापर करु नये असे सांगितले आहे.
सोशन न्यूज डेलीनुसार, कमीत-कमी चार जण एकत्र रेस्तराँमध्ये आल्यानंतर येथील लॉकरमध्ये ते आपले स्मार्टफोन लॉक करु शकतात. जर त्यांनी स्मार्टफोनशिवाय आपले संपूर्ण खाद्यपदार्थ संपविले, तर त्यांना दुसऱ्यावेळेला मोफत पिझ्झा मिळू शकतो किंवा पिझ्झा ते घरी घेऊन जावू शकतात. याशिवाय, पिझ्झा ते बेघर लोकांना दान करु शकतात.
रेस्तराँच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे की, 'कुटुंबाने किंवा मित्रांनी खाताना स्मार्टफोनचा वापर टाळावा, यासाठी आमचे प्रयत्न आहे. तसेच, एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. जर तुम्ही स्मार्टफोनशिवाय आपले संपूर्ण खाद्यपदार्थ संपविले, तर तुम्हाला दुसऱ्यावेळी मोफत पिझ्झा मिळू शकतो किंवा हा पिझ्झा तुम्ही बेघर लोकांना दान करु शकता.'