निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; 'या' सावित्रीनं नवऱ्याला आणलं यमाकडून परत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 09:48 AM2022-09-15T09:48:17+5:302022-09-15T09:48:32+5:30

तिच्या नवऱ्याला पिटर्सनला नेमका आजार तरी कोणता झाला होता? एका सुपरबगमुळे पिटर्सनला गलितगात्र करून सोडलं होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका तो मोजत होता.

American Woman Save Her Husband’s Life, husband suffered Superbug Infection | निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; 'या' सावित्रीनं नवऱ्याला आणलं यमाकडून परत 

निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; 'या' सावित्रीनं नवऱ्याला आणलं यमाकडून परत 

googlenewsNext

‘हनी.. तुझी ही काय अवस्था झालीय.. मी तुला या अवस्थेत पाहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन?.. पण तू तर असा वागतोयंस, जणू काही तुझ्यात जगण्याची इच्छाच राहिलेली नाही. तू तर कशालाच काहीही प्रतिसाद देत नाहीएस... जणू काही तू आत्ताच सगळ्या गाेष्टींच्या पलीकडे गेला आहेत... मी तुझ्याशी काय बोलतेय, हे तुला आत्ता ऐकू येतंय की नाही, तुला कळतंय की नाही, हे मला माहीत नाही; पण एक गोष्ट फक्त कर. तुला जर खरोखरच जगायची इच्छा असेल, तर माझा हात जोरात दाब..’

- असं म्हणून नवऱ्याचा हात हातात घेऊन बराच वेळ ती बसली. तिचा नवरा दवाखान्यात होता. एका असह्य आजारानं तो त्रस्त होता. त्याच्या सगळ्या संवेदना गेल्या होत्या. तो जगेल याची कोणालाच; अगदी जगातल्या निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; किंबहुना तो जगणार नाहीच, याचीच शाश्वती तिला सगळ्यांनी दिली होती. पण तिनं हिंमत हरली नव्हती. आताही ती गलितगात्र आणि मरणाच्या दारात असलेल्या आपल्या नवऱ्याच्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होती. तेवढ्याच तिला जाणवलं, आपल्या नवऱ्यानं आपला हात दाबलाय... तिला फारच आनंद झाला. तिच्या मनाला मोठी उभारी मिळाली; पण पुढच्याच क्षणी निराशेनं तिला पुन्हा घेरलं... या दुर्धर आजारातून आपण त्याला कसं वाचवू शकणार आहोत? मात्र नवऱ्यानं दिलेला हा छोटासा प्रतिसादही तिच्यात दुर्दम्य आशावाद आणि उत्साह पेरून गेला. ती पुन्हा हिरिरीनं कामाला लागली.

कोण ही? - तिचं नाव स्टेफानी स्ट्रॅथडी आणि तिच्या नवऱ्याचं नाव पिटर्सन. ती पेशानं epidemiologist म्हणजे ‘रोगपरिस्थितिविज्ञान’ किंवा ‘महामारीविज्ञाना’ची तज्ज्ञ. सगळे आणि सगळ्यांचे प्रयत्न संपल्यावर शेवटी ही ‘सावित्री’च कामाला लागली आणि आपल्या नवऱ्याला तिनं यमाच्या, मृत्यूच्या दारातून परत आणायचं ठरवलं.

तिच्या नवऱ्याला पिटर्सनला नेमका आजार तरी कोणता झाला होता? एका सुपरबगमुळे पिटर्सनला गलितगात्र करून सोडलं होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका तो मोजत होता. याची सुरुवात झाली हे दोघंही नवरा-बायको जेव्हा नाईल नदीच्या किनारी होते तेव्हा... अचानक पिटर्सनच्या पोटात दुखायला लागलं. असह्य वेदना व्हायला लागल्या. स्टेफानीनं त्याला लगेच इजिप्तमधल्या प्रख्यात डॉक्टरांकडे हलवलं. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण त्यांनी हात टेकले. तुझा नवरा यातून वाचणं अशक्यच आहे, हे त्यांनी तिला जणू सांगूनच टाकलं; पण स्टेफानीला हे मान्य होणं शक्यच नव्हतं. 

तिनं पिटर्सनला इजिप्तहून जर्मनीला हलवण्याचा निर्णय घेतला. तिथल्याही जगप्रसिद्ध डॉक्टरांना ती भेटली. त्यांनीही आपलं सारं कौशल्य पणाला लावलं, इतरांचीही मदत घेतली; पण पिटर्सन कोणत्याही उपचारांना काहीही प्रतिसाद देत नव्हता. जर्मनीच्या या डॉक्टरांनीही आपली असमर्थता प्रकट केली; पण स्टेफानीला आपल्या नवऱ्याची साथ सहजासहजी सोडायची नव्हती. शेवटी ती एकटीच उभी राहिली. 
हा सुपरबग असा आहे तरी काय, याचा शोध, अभ्यास करायला स्टेफानीनं सुरुवात केली. आपल्या नवऱ्याच्या शरीरात घुसलेल्या या सुपरबगला मारलं, तर तो जगू शकेल, याची तिला खात्री होती; पण हा सुपरबग जणू काही ‘अमर’ होता, आहे, जो निदान आत्ता तरी जगातल्या कोणत्याच औषधांना दाद देत नाही. यासाठी स्टेफानीनं काय करावं?... तिनं एक ‘नॅचरल व्हायरस’ तयार केला. त्यासाठी तिनं अक्षरश: गटारी, दलदल, तलाव, सडलेली लाकडं, रानटी गवत, डबकी... ज्या ज्या गलिच्छ ठिकाणी वेगवेगळे जिवाणू वाढतात, तिथले जिवाणू तिनं एकत्र केले आणि त्यांचं ‘कॉकटेल’ तयार करून आपल्या नवऱ्याला पाजलं ! आणि काय आश्चर्य, थोड्याच दिवसांत पिटर्सन एकदम ठणठणीत बरा झाला! पण आपल्या नवऱ्याचे प्राण परत  आणताना तिनं जगावरही उपकार करून ठेवले!

सुपरबग घेईल दर ३ सेकंदाला एक बळी
मध्यपूर्वेच्या रेतीत हा सुपरबग आढळतो. इराक यु्द्धात बहुसंख्य अमेरिकी सैनिकांच्या जखमांमध्ये हा सुपरबग आढळून आला होता. त्यामुळे नंतर त्याचं नाव ‘इराकीबेक्टर’ असं ठेवण्यात आलं. दिवसेंदिवस या सुपरबगचा धोका वाढत असून २०५०पर्यंत सुमारे एक कोटी लोकांचा, म्हणजे दर तीन सेकंदांना एका व्यक्तीचा तो जीव घेईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरवर्षी या सुपरबगमुळे ७० लाख लोक मरतात; पण स्टेफानीच्या या शोधामुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे.

Web Title: American Woman Save Her Husband’s Life, husband suffered Superbug Infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.