कुत्रा मालकाला चावला, संतप्त मालक कुत्र्याला चावला; अन् मग भलताच प्रकार घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:22 PM2021-10-20T12:22:03+5:302021-10-20T12:23:26+5:30
कुत्र्याला भरवत असताना तो मालकाला चावला; संतापाच्या भरात मालकानं कुत्र्याचा चावा घेतला
गोपालगंज: बिहारच्या गोपालगंजमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. एक तरुण त्याच्या कुत्र्याला घेऊन उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला. कुत्र्यानं मालकाचा चावा घेतला. त्यामुळे संतापलेला मालक कुत्र्याला चावला. यानंतर तरुण स्वत: त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पोहोचला. तो इमर्जन्सी वॉर्डमध्ये इकडे तिकडे भटकू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ओपीडीमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांनी तरुणाला रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. कुत्र्याचा चावा घेणाऱ्या पीडित तरुणाचं नाव मन्नू मांझी असं आहे. त्याचं वय २६ वर्षे आहे. तो बसडीला गावात वास्तव्यास आहे. मन्नू मांझीनं एक कुत्रा पाळला आहे. मंगळवारी मन्नू त्याला जेवण भरवत होता. त्यावेळी कुत्रा मन्नूला चावला. यामुळे मन्नू संतापला. रागाच्या भरात त्यानं कुत्र्याचा चावा घेतला. त्यामुळे कुत्रा जखमी झाला.
एकमेकांना चावल्यानं कुत्रा आणि मन्नू दोघेही जखमी झाले. मन्नू त्याच्या कुत्र्याला घेऊन दुचाकीवरून रुग्णालयात पोहोचला. कुत्र्याला कुशीत घेऊन मन्नू इमर्जन्सी वॉर्डमध्ये भटकत होता. त्यानंतर तो ओपीडीमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी त्याला रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मन्नू कुत्र्यासोबत पशू रुग्णालयात गेला. तिथे त्यानं कुत्र्यावर उपचार करून घेतले.