चिंटुकल्या मुंग्या ‘शस्त्रक्रिया’ही करतात; एका संशोधनातून आणखी एक गुण समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 07:02 AM2024-07-05T07:02:48+5:302024-07-05T07:03:23+5:30

शस्त्रक्रिया करण्याची क्षमता असलेला मानवानंतरचा हा दुसरा जीव

Ants also perform 'surgery'; Another point emerges from a research | चिंटुकल्या मुंग्या ‘शस्त्रक्रिया’ही करतात; एका संशोधनातून आणखी एक गुण समोर

चिंटुकल्या मुंग्या ‘शस्त्रक्रिया’ही करतात; एका संशोधनातून आणखी एक गुण समोर

वॉशिंग्टन : मुंग्यांना विश्रांती काय हे माहिती नसते. त्यांची सतत धावपळ सुरू असते. त्यांची गणना सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात त्यांचा आणखी एक गुण समोर आला आहे.

संशोधकांच्या मते, काही मुंग्या त्यांच्या आजारी साथीदारांवर उपचार करतात आणि गरज पडल्यास त्यांच्यावर ‘शस्त्रक्रिया’ही करतात. मानवानंतर, शस्त्रक्रिया करण्याची क्षमता असलेला हा एकमेव जीव आहे. मुंग्यांमध्ये जखम ओळखण्याची व त्यावर उपचार करण्याची जन्मजात क्षमता असते, असे ॲरिक फ्रँक यांच्या नेतृत्वातील संशोधन करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. 

प्रतिजैविक पदार्थांशिवाय उपचार
ॲरिक फ्रँक म्हणाले की, गेल्या वर्षी एका संशोधनात असे आढळून आले होते की, आफ्रिकन मुंग्यांची एक प्रजाती ‘मेगापोनेरा ॲनालिस’ त्यांच्या ग्रंथींमध्ये असलेल्या अँटीमाइक्रोबियल पदार्थाने सहकारी मुंग्यांच्या जखमा भरून काढते. फ्लोरिडा मुंग्यांना अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे शास्त्रज्ञांना हे जाणून घ्यायचे होते की, या मुंग्या त्यांच्या साथीदारांना झालेल्या जखमा कशा बऱ्या करतात.

खराब अवयव कापतात
फ्लोरिडा (अमेरिका) मध्ये मुंग्यांचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना आढळून आले की, ते त्यांच्या जखमी साथीदारांच्या जखमा स्वच्छ करतात आणि खराब झालेले अवयव कापतात. ही प्रक्रिया तंतोतंत डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाचा खराब झालेला अवयव काढून टाकतात तशीच असते. या मुंग्या ‘कॅम्पोनोट्स फ्लोरिडन्स’ या प्रजातीच्या आहेत.

इतर भागाला नुकसान नाही
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मानवानंतर इतर सजीवांमध्ये अवयव कापून उपचार करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. मुंग्या शरीराच्या खराब झालेल्या भागाला अशा पद्धतीने कापतात की शरीराच्या इतर कोणत्याही भागाला इजा होणार नाही. संशोधनात असे आढळून आले की, ज्या मुंग्यांचा अवयव कापल्यानंतर जगण्याची क्षमता ४० टक्के होती. ती शस्त्रक्रियेनंतर ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत वाढली होती.

Web Title: Ants also perform 'surgery'; Another point emerges from a research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.