तुम्ही उंच आहात? - पण ‘शायनिंग’ मारू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 10:31 AM2022-06-09T10:31:33+5:302022-06-09T10:31:57+5:30

आपली उंची वाढली की आपला आत्मविश्वास वाढेल असंही अनेकांना वाटतं. उंच असण्याचे असे अनेक फायदे असताना उंचीचे तोटेही होऊ शकतात अशी कुणी कल्पना तरी केली असेल का? पण आता असं दिसतंय की, उंच माणसांना काही आजार चटकन होतात.

Are you tall - But don't kill 'Shining'! | तुम्ही उंच आहात? - पण ‘शायनिंग’ मारू नका!

तुम्ही उंच आहात? - पण ‘शायनिंग’ मारू नका!

Next

उंचीचं आकर्षण सामान्यत: माणसांना असतंच. त्यात आपल्याकडे उंच-धिप्पाड असणं हे व्यक्तिमत्त्वाचे काही गुण ठरवले गेले. पुढे जागतिकीकरणाच्या काळात तर जाहिराती ते फॅशन जगतात उंचच मॉडेल्स येऊ लागले. उंची चांगली असणं ही जमेची बाजू ठरू लागली. ज्यांची उंची कमी किंवा सर्वसाधारण, ते उंच व्यक्तींकडे सर्वसामान्य असूयेनं बघू लागले. त्यात  ‘दिसण्याच्या’ स्पर्धेत वेड्या झालेल्या जगाला उंच होण्याच्या वेगानं इतकं झपाटलं की उंची वाढवण्याचे वर्गदेखील शहरा-शहरांत सुरू झाले. आपली उंची वाढली की आपला आत्मविश्वास वाढेल असंही अनेकांना वाटतं. उंच असण्याचे असे अनेक फायदे असताना उंचीचे तोटेही होऊ शकतात अशी कुणी कल्पना तरी केली असेल का? पण आता असं दिसतंय की, उंच माणसांना काही आजार चटकन होतात.

प्लॉस जेनेटिक ओपन ॲक्सेस पब्लिकेशनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की, कुठल्याही माणसाच्या उंचीनुसार, मग ती कमी असो किंवा जास्त, त्याला काही प्रकारच्या आजारांचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. उंच माणसांना हातापायांमधील नसांना इजा झाल्यामुळे होणाऱ्या पेरिफेरल न्युरोपॅथीचा तसंच हाडं आणि स्नायूंना होणाऱ्या इन्फेक्शनचा धोकाही जास्त असतो. पायाचा किंवा पावलांचा अल्सर होण्याची शक्यताही अधिक असते.

खरंतर जास्त उंच माणसांना हृदयरोग किंवा कर्करोगाचा जास्त धोका असतो हे यापूर्वीच शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं होतं. मात्र, हे रोग होण्याची वृत्ती उंचीमुळे बळावते की उंची वाढण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात तेच घटक या आजारांना आमंत्रण देतात याबद्दल शास्त्रज्ञांची खात्री नव्हती. उत्तम आहार, पुरेशी विश्रांती, योग्य वातावरणात केलेलं काम हे घटकदेखील उंची वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात, की हे सारे केवळ उंचीशीच संबंधित आहे, या प्रश्नाचं ठोस उत्तर मात्र शास्त्रज्ञांकडे नव्हतं. आता मात्र या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावणारे श्रीधरन राघवन म्हणतात, उंची जास्त असण्याचा थेट संबंध ऍट्रिअल फायब्रिलेशन आणि व्हेरिकोज व्हेन्सच्या वाढीव धोक्यांशी आहे.
या अभ्यासात अडीच लाखांपेक्षा जास्त अमेरिकन व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.  त्यात दोन लाख व्यक्ती श्वेतवर्णीय होत्या, तर सुमारे पन्नास हजार व्यक्ती कृष्णवर्णीय होत्या. एक हजारहून जास्त आजार आणि व्याधींचा अभ्यासही यात करण्यात आला. उंची आणि आजार या विषयावरील हा सगळ्यात मोठा अभ्यास ठरल्याची चर्चा आहे.

मुळात माणसाची उंची किती असावी ही काही त्याच्या हातातली गोष्ट नाही. त्यामुळे या आजारांचा धोका आहे म्हणून उंची कमी किंवा जास्त करणं असं काही माणूस करू शकत नाही. मात्र, आपल्याला कुठले आजार होण्याची शक्यता जास्त आहे हे जर वेळेवर लक्षात आलं, तर ते आजार टाळण्याच्या दृष्टीने जीवनशैलीमध्ये काही बदल मात्र निश्चितपणे करता येऊ शकतात. या अभ्यासातून हाती आलेल्या माहितीनुसार माणसाच्या उंचीप्रमाणे व्यक्तीला कुठले रोग होण्याची शक्यता कमी किंवा जास्त आहे याचं उत्तर मिळू शकतं. जगभरातल्या अन्य वंशीय माणसांचा असा अभ्यास अधिक व्यापक स्तरावर झाला तर अजून माहिती मिळू शकते. तोवर माणसाच्या उंचीचे जगण्यावर होणारे परिणाम समजून घेणंही मोठं रंजक आहे.

शारीरिक उंची आणि कर्तृत्वानं कमावलेली उंची या दोन्ही भिन्न गोष्टी असल्या तरी शारीरिक उंची कमी असली तर विनाकारण न्यूनगंड येणं, त्यामुळे आपल्याला काही संधी नाकारल्या जातात असं वाटणं हे अनेकांच्या बाबतीत घडतं. उंचीला चिकटलेली ही जुनी मतं जितकी मागे पडतील, तितकीच वाढ ‘निकोप’ व्हायला मदत होईल.

हृदयिवकार, रक्तदाबाचं टेन्शन नाही..
उंची जास्त असणाऱ्या व्यक्तींना काही आजारांचा धोका जसा जास्त असतो, तसाच काही आजारांचा धोका कमीही असतो. शरीरात अधिक कोलेस्टेरॉलमुळे होणारे विकार आणि रक्तदाबाचा धोका त्यांना कमी संभवतो, असंही या अभ्यासात आढळून आलं आहे. अर्थात याचा दुसरा अर्थ असाही होतो की, उंची कमी असणाऱ्या व्यक्तींना या तीन आजारांचा धोका जास्त आहे.

Web Title: Are you tall - But don't kill 'Shining'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.