बॉस असावा तर असा..!! कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही 'घरबसल्या' मिळणार पगार, अटी फक्त दोनच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:29 PM2023-05-23T21:29:20+5:302023-05-23T21:30:21+5:30
ही कंपनी एका भारतीय माणसाचीच आहे, जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल
Salary to wives of employees: गृहिणींनो, जर तुमचा नवरा काम करत असलेल्या ऑफिसमधून तुमच्याही बँक खात्यात दरमहा पगार पोहोचला तर कसे वाटेल याची कल्पना करा. विचार करायला मजा येतेय ना... पण एकदा मन असंही म्हणत असेल की असं कसं होईल बरं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही बातमी अगदी खरी आहे. तुमचा नवरा ऑफिसमध्ये काम करेल आणि घरबसल्या पगार तुमच्या खात्यात जमा होईल. एका कंपनीने अशी सुरुवात केली आहे, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. कंपनीने कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पत्नींना पगार देण्याचे ठरवले. या कंपनीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे, कारण २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या कंपनीच्या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना 30 कोटी रुपयांची भेट दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या गृहिणींनी किती पगार मिळणार?
UAE मधील शारजाह येथे राहणाऱ्या सोहन रॉय या भारतीय व्यावसायिकाने एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. 2021 मध्ये त्यांनी पुढाकार घेतला. कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही पगार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ज्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी गृहिणी आहेत किंवा कोणतेही काम करत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पगार किती मिळणार याचेही सूत्र तयार करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या 'टेक अवे होम' पगारातील २५ टक्के रक्कम त्यांच्या पत्नींना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना लाभ नाही, 'ही' आहे अट
कंपनीचे सीईओ सोहन रॉय यांनी सांगितले की, पती जे काही कमावतात त्यातील 25 टक्के हिस्सा पत्नीकडे जातो. कोरोना महामारीच्या काळात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पत्नींना पगार देण्याचा निर्णय घेतला होता. पण सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीत ३ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना हा लाभ मिळणार आहे. खलीज टाइम्सच्या बातमीनुसार, कंपनी व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा डेटाबेस तयार केला आहे. ज्या स्वत: नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत, अशा गृहिणींनाच नियमित पगार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कर्मचाऱ्यांना ३० कोटींची भेट
एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ सोहन रॉय यांनी कंपनीला २५ वर्षे पूर्ण केली. कंपनीने हा खास सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. कंपनीचे सीईओ सोहन रॉय यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 'रौप्य महोत्सवी भेट' जाहीर केली. कंपनीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचार्यांना वेतनवाढ आणि प्रोत्साहनाव्यतिरिक्त विशेष भेट देण्यात आली. कंपनीने 'रौप्य महोत्सवी भेट' म्हणून ३० कोटी रोख तसेच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी म्हणजे आई-वडील, पत्नी आणि मुलांसाठी विशेष भेटवस्तू जाहीर करण्यात आल्या आहेत. एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ सोहन रॉय यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी हे काम केले आहे.
कोण आहेत सोहन रॉय?
सोहन रॉय हे Aries ग्रुप ऑफ कंपनीजचे CEO आहेत. मुळात भारतीय सोहन रॉय यांच्या कंपनीचे मुख्यालय UAE मध्ये आहे. एकेकाळी मरीन इंजिनिअर असलेल्या सोहन रॉय यांनी ही कंपनी सुरू केली. 1998 मध्ये त्यांनी सागरी आणि अभियांत्रिकी सेवा सुरू केली. व्यवसायासोबतच ते चित्रपट निर्मितीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या कंपनीत 2200 हून अधिक कर्मचारी आहेत. त्यांच्या व्यवसायाचा व्याप २५ देशांमध्ये विस्तारलेला आहे.