जन्मापासून नाही हात तरी आहे स्वत:च्या 'पायां'वर भक्कम उभी, मुलीचा करते उत्तम सांभाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:09 PM2022-04-04T15:09:16+5:302022-04-04T15:12:32+5:30
आज ती केवळ तिच्या पायावर उभी नाही, तर तिच्या ३ वर्षांच्या मुलीची आणि घरातली सर्व कामं ती तिच्या पायाच्या मदतीनं करते. सराहचा हात नसतानाही संघर्ष आणि जिद्द पाहिली की तुमचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.
धडधाकट असूनही आपल्या समस्येंसाठी रडत बसणारे अनेक जण तुम्ही पाहिले असतील. पण सराह ताल्बीची (Sarah Talbi) कहाणी अशा लोकांसाठी प्रेरणेपेक्षा (Inspirational Story) कमी नाही, जे आपले दोन्ही हात आणि पाय धडधाकट असतानाही अडचणींचा दुसऱ्यांपुढे पाठ वाचत रडत राहतात. सराहला जन्मपासून दोन्ही हात नव्हते. परंतु आज ती केवळ तिच्या पायावर उभी नाही, तर तिच्या ३ वर्षांच्या मुलीची आणि घरातली सर्व कामं ती तिच्या पायाच्या मदतीनं करते. सराहचा हात नसतानाही संघर्ष आणि जिद्द पाहिली की तुमचाही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.
सराह ताल्बी मूळची बेल्जियमची आहे आणि ती जन्मापासून अपंग आहे. परंतु हात नसल्यामुळे ती रडत बसली नाही, तर तिने हातांनी करायची कामंही पायाने करायचं कौशल्य विकसित केलं. आज ज्या वेगाने ती पायाने स्वयंपाक (cooking) करते ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. केवळ स्वयंपाकच नाही, तर आपल्या मुलीला तयार करण्यापासून ते घरातली इतर सर्व कामं ती पायांच्या मदतीने करते.
सराह ताल्बी एक कलाकार (artist) आहे आणि तिला ३ वर्षांची मुलगी आहे. लिलिया असं तिच्या मुलीचं नाव असून तिला अंथरुणातून उठवण्यापासून ते शाळेसाठी तयार करण्याचं काम सराह स्वतः करते. हात नसल्याने ती दुसऱ्यांवर अवलंबून नाही, तर ती सर्व कामं पायाने करायला शिकली आहे. घरातली सर्व कामं ती पायाच्या मदतीने अगदी कुशलतेने हाताळते.
मुलीच्या जन्माच्या वेळी, सारा तिला उचलताना थोडी घाबरायची, पण नंतर तिला याची सवय झाली. आता तर ती भाजी चिरणं आणि जेवण तयार करणं ही कामं खुर्चीवर बसून अगदी चोखपणे करते शिवाय मुलीलाही सांभाळते.
सराहचं एक युट्यूब चॅनल (YouTube Channel) आहे. या यूट्यूब चॅनलवर ती तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करते. सराहचे तब्बल 2 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत. सराह तिच्या फॉलोअर्सना प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडीओ बनवते. सराह म्हणते की तिला आश्चर्य वाटतं की बऱ्याच लोकांना तिच्या कमतरतांबद्दल जाणून घ्यायचं आहे. तिची मुलगी लिलियालाही तिची परिस्थिती समजून घेते. सराहला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये पतीची साथ मिळते, तो तिला खूप मदत करतो असं ती सांगते. तसंच सुरुवातीला ती मुलीला आवरताना नवऱ्याची मदत घ्यायची, पण नंतर हळूहळू सगळी कामं ती स्वतः करू लागली, असं सराह सांगते.
सराह ताल्बीची ही कहाणी खरंच प्रेरणादायी आहे. जन्मापासून दोन्ही हात नसूनही तिने कुणावरही अवलंबून न राहता आणि निराश न होता सर्व कामे शिकून घेतली आणि आता पायाच्या मदतीने ती सर्व कामं करते.