ना रंग, ना माती चक्क बुटांपासून तयार केलीय ही कलाकृती, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:20 PM2022-08-24T17:20:39+5:302022-08-24T17:28:34+5:30
ट्विटरवर सध्या बुट आणि बुटातील सोलचा वापर करून साकारलेल्या मानवी चेहऱ्याच्या कलाकृतीलाही भरपूर पसंती मिळत आहे.
सोशल मीडियावर सध्या असंख्य कलाकृती पाहायला मिळतात. दरवेळी महागड्या वस्तू विकत घेऊन त्यापासून कलाकृती तयार करणं गरजेचं नसतं. उलटपक्षी अनेकजण तर टाकाऊ वस्तूंपासून एकाहून एक सरस कला साकारतात. ट्विटरवर सध्या बुट आणि बुटातील सोलचा वापर करून साकारलेल्या मानवी चेहऱ्याच्या कलाकृतीलाही भरपूर पसंती मिळत आहे.
ट्विटरवर @Artsandcultr या युजर नेमवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात कलाकाराने बुट व बुटातील सोल अशाप्रकारे रचले आहेत की, दुरून पाहिल्यावर त्यात कोट, टाय घातलेला एक सुरेख मानवी चेहरा दिसत आहे. ही कला पाहून अनेक नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत. ही कलाकृती साकारण्यासाठी शेकडो बुटांचा वापर केला गेलाय. बुटांना व त्यातील सोलला या कलाकाराने विशिष्ट अंतरावर ठेवलं आहे. घरात प्रवेश करताना दाराला असलेल्या छोट्या काचेतून पाहिलं की तो चेहरा दिसतो. दार उघडून आत गेल्यावरही ते एखादं धातुचं शिल्प असावं असंच वाटतं पण थोड पुढं कलाकृतीजवळ गेलं की लक्षात येतं की हे बुट आणि सोल्स वापरून साकारलेला चेहरा आहे.
अनेकदा कॅन्व्हासवरील चित्र पाहून ते खरं असल्याचा भास आपल्याला होतो. पण बुटांची व सोलची रचना विशिष्ट पद्धतीनं करून त्याद्वारे जिवंत कलाकृती साकारण्याची ही अतिशय दुर्मिळ बाब आहे असं वाटू लागतं. प्रथमदर्शनी पाहताना हे एक कॅन्व्हासवरील चित्र आहे की काय असा भास होतो. परंतु जसजसं तुम्ही त्याच्या जवळ जाता तसं एक एक बुट व सोल पाहून चकित झाल्याशिवाय राहणार नाही. ही कला पाहिल्यानंतर कलाकाराची उत्तम समज, त्याचं कौशल्य आणि त्याची कलेकडे पाहण्याची अनोखी दृष्टी समोर येते. या कलाकाराने कला साकारण्यासाठी पांढऱ्या, काळ्या आणि काही मळकट बुटांचा वापर केल्याचं दिसतं. ज्या ठिकाणी ज्या रंगाचा बुट किंवा सोल आवश्यक आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करण्यात आलाय.
Beautiful artwork made with shoe 👠👟.....💕 pic.twitter.com/vvz96CLDBX
— Art World (@Artsandcultr) August 20, 2022
पॅट्रिक प्रोस्को नावाच्या कलाकाराने 2019 मध्ये प्रागमध्ये इल्युजन आर्ट वस्तूसंग्रहालयासाठी (Illusion Art Museum) टॉमस बाटाची निर्मिती केली होती. अशा प्रकारच्या इन्स्टॉलेशन आर्टसाठी (Installation Art) पॅट्रिक प्रोस्को ओळखले जातात. त्यांनी आजवर दररोजच्या वापरल्या जाणाऱ्या व टाकाऊ वस्तूंचा वापर करून अनोख्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यांची वैभवसंपन्न कला पाहून अनेकजण या कलेच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या हा व्हिडिओ पाहून युजर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या कलाकृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर एका युजरने तर म्हटलं की, एखाद्या कलाकाराला अशाप्रकारे कला सुचली हीच बाब चकित करणारी आहे. व्हिडिओतील कलाकृतीचं कौतुक करताना इतर काही कलाकारांनी त्यांच्या कलेच्या व्हिडिओही शेअर केला आहे.