औरंगाबादेत धुळीत बसून दिली परीक्षा
By admin | Published: March 17, 2016 01:41 AM2016-03-17T01:41:09+5:302016-03-17T01:41:09+5:30
मंगळवारी सुरू झालेल्या एमएच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ढेपाळलेल्या नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. बाकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धुळीत बसून
औरंगाबाद : मंगळवारी सुरू झालेल्या एमएच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ढेपाळलेल्या नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. बाकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धुळीत बसून पेपर द्यावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात हा प्रकार घडला, तर दुसरीकडे मौलाना आझाद महाविद्यालयात एमए उर्दू आणि एमसीजे या दोन विषयांचे पेपर तब्बल एक तास उशिराने सुरू झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमएच्या परीक्षेचा इंग्रजी विषयाचा (३० गुण) पेपर सकाळी १० वाजता होणार होता. मात्र, परीक्षा क्रमांक दिसून न आल्याने विद्यार्थी चलबिचल झाले. नंतर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
या ठिकाणी तीन हॉलमध्ये व्यवस्था होती. ग्रंथालयातील एका रीडिंग टेबलवर चार ते सहा विद्यार्थी एकत्रित बसून पेपर लिहिताना दिसले. वरच्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये तीस ते चाळीस विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली. मात्र, या खोल्या अनेक महिन्यांपासून झाडलेल्या नसल्याने धुळीने माखलेल्या होत्या.
पाच ते सहा विद्यार्थिनींना बसायला बेंच नव्हते. त्यामुळे त्यांना एका लाकडी बाकड्यावर बसविण्यात आले. काही विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर धुळीत बसून पेपर लिहावा लागला. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्यासाठी पॅड आणले नव्हते, त्यामुळे त्यांची पंचाईत झाली.
या संदर्भात आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर साळवे यांच्याशी संपर्क साधताच ते म्हणाले, ‘प्राचार्यांचा परीक्षेशी काही संबंध नसतो.’ केंद्रप्रमुख डॉ. व्ही. के. खिल्लारेंनी सांगितले, ‘विद्यापीठाने ऐन वेळी विद्यार्थ्यांनी संख्या वाढवल्याने हा प्रकार घडला व विद्यार्थ्यांना धुळीत बसावे लागले.’ विद्यापीठाने परीक्षा केंद्राचे नियोजन आधीपासून असल्याचे म्हटले व महाविद्यालयाचीच चूक असल्याचे म्हटले आहे.