७० किलो केळी पडली ४ कोटी रुपयाला, मालकाला द्यावी लागली नोकराला नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 04:52 PM2021-10-11T16:52:41+5:302021-10-11T16:56:30+5:30
झाडावरून केळी तोडताना एक शेती कामगार जखमी झाला. यानंतर जे झाले ते अतिशय गंमतीचे होते, कारण अपघातानंतर शेती कामगाराने केलेल्या कृतीनंतर तो थेट करोडपती झाला आहे. जाणून घ्या त्या कामगाराने असे काय केले ज्याने तो थेट करोडपती झाला.
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्वीन्सलँडमध्ये (Queensland) झाडावरून केळी तोडताना एक शेती कामगार जखमी झाला. यानंतर जे झाले ते अतिशय गंमतीचे होते, कारण अपघातानंतर शेती कामगाराने केलेल्या कृतीनंतर तो थेट करोडपती झाला आहे. जाणून घ्या त्या कामगाराने असे काय केले ज्याने तो थेट करोडपती झाला.
ही घटना कुकटाऊनजवळील एका शेतात घडली. येथे लॉंगबॉटम नावाचा एक मजूर झाडांपासून केळी तोडण्याचे काम करत होता. एल अँड आर कॉलिन्स फार्ममध्ये काम करत असताना, तो केळ्याच्या मोठ्या घडासह पडला आणि गंभीर जखमी झाला. द केर्न्स पोस्टच्या अहवालानुसार, जेमीवर एक मोठे केळीचे झाड आणि केळ्याचा मोठा गुच्छ पडला होता, ज्यामुळे तो जखमी झाला होता.
जेमी केळीचे झाड आणि केळी पडल्यानंतर कामावर परत येऊ शकला नाही. यानंतर, त्याने कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगत कंपनीच्या मालकावर खटला दाखल केला. या खटल्यामध्ये केळ्यांचे जड घड कसे हाताळावे याचे प्रशिक्षण कामगारांना दिले गेले नाही. अशी तक्रार करण्यात आली आहे . झाडे अनपेक्षितपणे उंच होती आणि केळी देखील उंचीवर होती. जेमीने त्याच्या उजव्या खांद्यावर केळ्यांचा घड ठेवला आणि केळ्यांच्या जास्त वजनामुळे तो त्याच्या उजव्या बाजूला जमिनीवर पडला. जेव्हा त्याला कुकटाऊनमधील रुग्णालयात आणण्यात आले, त्या घटनेनंतर तो कामावर परतू शकला नाही.
कोर्टाने कामगाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपल्या निर्णयात म्हटले आहे की, जेमी ७० किलो केळी घेऊन पडला होता. या अपघातानंतर त्याला कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम करता आले नाही. म्हणून न्यायालयाच्या वतीने, जेमीला $ ५ लाख २ हजार ७४० डॉलर्स म्हणजेच त्याच्या कंपनीला ४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.