सोन्याच्या शोधात असलेल्या व्यक्तीला सापडली मौल्यवान वस्तू, किंमत लावणे अशक्य..!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 09:35 AM2021-11-25T09:35:23+5:302021-11-25T09:35:29+5:30
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये सोने शोधण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीला असा दगड सापडला, ज्याची किंमत सांगणेही कठीण आहे.
कधी-कधी आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टीच्या शोधत असता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मौल्यवान गोष्ट तु्म्हाला मिळते. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. सोने शोधण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीला असा दगड सापडला, ज्याची किंमत सांगणेही कठीण आहे. अनेक वर्षे त्या व्यक्तीने तो दगड जपून ठेवला. पण, एके दिवशी त्याला त्यात सोन्यासारखं काही दिसलं नाही तेव्हा त्याने तो दगड म्युझियममध्ये नेला. तिथे तो सामान्य दगड नसून अब्जावधी वर्षे जुना उल्का असल्याची माहिती त्याला मिळाली.
2015 मध्ये दगड सापडला होता
मेलबर्नमध्ये राहणारा डेव्हिड हॉल 2015 मध्ये मेलबर्नजवळील मेरीबरो रीजनल पार्कमध्ये पोहोचला. येथे त्याला लाल आणि पिवळ्या रंगाचा दगड सापडला. सोन्याचा दगड वाटून त्याने तो घरी नेला. त्या दगडाला सोने मानण्यामागचे कारण म्हणजे हे ठिकाण 19व्या शतकात सोन्यासाठी खूप प्रसिद्ध होते, येथे मोठ्या प्रमाणात सोने सापडले होते. हाच विचार करुन डेव्हिडने तो दगड उचलला आणि सोने समजून घरी नेला.
6 वर्षांनी उडाली तारांबळ
घरी आणल्यानंतर डेव्हिडने तो दगड फोडून सोने मिळवण्याचा प्रयत्न केला, पण दगड फुटला नाही. यानंतर त्यांनी तो दगड तसाच घरात ठेवला. 2021 मध्ये 6 वर्षांनंतर त्याच्या मनात आले की या दगडात ना सोने आहे आणि ना तो सामान्य दगडासारखा दिसत आहे. यानंतर त्याने हा अनोखा दगड मेलबर्न म्युझियममध्ये नेला.
1000 वर्षांपूर्वी पडल्याचा अंदाज
तिथे त्याने अधिकाऱ्यांना दगड दाखवला तेव्हा त्या लोकांचे उत्तर ऐकून डेव्हिडला धक्का बसला. त्याला सांगण्यात आले की, हा दगड नसून अब्जावधी वर्षे जुना उल्कापिंड आहे. दगड पाहिल्यानंतर संग्रहालयातील भूवैज्ञानिक डर्मट हेन्री यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, मी माझ्या आयुष्यात फक्त दोनच उल्का पाहिल्या आहेत, त्यापैकी हा एक आहे. हेन्रीने डेव्हिडला सापडलेल्या उल्काचा अंदाज लावला की, तो मंगळ आणि गुरू ग्रह यांच्यामध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातून आला असावा. ही उल्का 4.6 अब्ज वर्षे जुनी असू शकते आणि 100 ते 1000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर पडल्याचा अंदाज लावला जात आहे.