सृदृढ बाळाच्या जन्मासाठी सेक्स टाळा, सरकारची गर्भवतींना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 06:01 PM2017-06-13T18:01:28+5:302017-06-13T18:01:28+5:30
पंतप्रधान कार्यालयानं गर्भवती महिलांसाठी एक विशिष्ट प्रकारची सूचना प्रसिद्धीस दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान कार्यालयानं गर्भवती महिलांसाठी एक विशिष्ट प्रकारची सूचना प्रसिद्धीस दिली आहे. या सूचनेनुसार, गर्भवती महिलांनी सदृढ बाळाला जन्म देण्यासाठी सेक्स करणं आणि मांस खाणं टाळलं पाहिजे. तसेच स्वतःच्या डोक्यातही शुद्ध आणि सकारात्मक विचार ठेवावेत, असंही मोदी सरकारनं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
गर्भवती महिलांनी स्वतःच्या रूममध्ये सुंदर सुंदर फोटो लावावेत, असा सल्लाही दिला आहे. मोदी सरकार दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी कायम चर्चेत असते. मात्र आता मोदी सरकारनं जे गर्भवती महिलांसाठी सूचनांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनने गर्भवती महिलांना हा सल्ला दिला आहे. गर्भवती महिला सृदृढ बाळाला जन्म द्यायचा असल्यास त्यांनी कटाक्षानं घाणेरडे विचार आणि मांस खाणे टाळलं पाहिजे. तसेच गर्भवती असताना सकारात्मक आणि शुद्ध विचार करण्याची गरज आहे, असंही आयुष प्रीस्क्रिप्शनने म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनमध्ये जवळपास दरवर्षी 2.6 कोटी मुलं जन्माला येतात. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं असून, ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परदेशात निघून गेले आहेत. या प्रसिद्धीपत्रकावर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झाली नाही. तसेच त्यांनी स्वतःचा मोबाईलही बंद ठेवला आहे.
(आईच्या गर्भातच मुलांना संस्कार देणार RSS)
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसनं गर्भधारणा विज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून गर्भातच मुलांना चांगले संस्कार देण्याचा दावा केला होता. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहयोगी संघटना आरोग्य भारती प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आरोग्य भारतीच्या कार्यक्रमाला गर्भ संस्कार कार्यशाळा असे नाव दिले होते. दोन दिवसीय चाललेल्या या कार्यशाळेच्या जाहिरात पुस्तिकेत डॉ. करिश्मा नरवीन यांना गर्भ संस्कार स्पेशालिस्ट सांगण्यात आलं होतं. डॉक्टर नरवीन या गुजरातमधील जामनगरमध्ये एका आयुर्वेदिक विश्वविद्यापीठात एक अतिथी व्याख्याता आहेत. त्या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी कोलकात्यात आले होते.
आयुर्वेदिक विश्वविद्यापीठातील नरवीन यांचे सहकारी डॉ. हितेश जानी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, गर्भ संस्कारांनी प्रतिभाशाली मुलांना जन्म देता येऊ शकतो. तसेच जेनेटिक इंजिनीअरिंगच्या माध्यमातून गर्भातच मुलांना संस्कारी बनवलं जाऊ शकतं. पश्चिम बंगालच्या बाल अधिकार संरक्षण आयोगानं या विरोधात कोर्टाचा दरवाजाही ठोठावला होता. आयोगानं याला अवैज्ञानिक सांगितलं होतं. मात्र उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अनन्या चक्रवर्ती म्हणाल्या होत्या, हा विज्ञानावर अंधश्रद्धेचा विजय आहे. तसेच आरोग्य भारतीचे वकील प्रणब घोष यांनी आम्ही न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करणार असल्याचं सांगितलं आहे. व्याख्यानाचा व्हिडीओ सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं आरोग्य भारतीला दिले होते.ऑ