जगातल्या सर्वात सुंदर डोळ्यांना पुरस्कार! सहज काढलेल्या फोटोनं केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 08:58 AM2022-02-16T08:58:55+5:302022-02-16T08:59:04+5:30

ओमानमधील एका छोट्याशा निरागस मुलीचे हे फोटो आहेत. सहजच म्हणून काढलेल्या या फोटोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पारितोषिक मिळालं आणि फोटोग्राफर मालामाल झाला.

Award for the most beautiful eyes in the world! Photo of an innocent little girl from Oman | जगातल्या सर्वात सुंदर डोळ्यांना पुरस्कार! सहज काढलेल्या फोटोनं केले मालामाल

जगातल्या सर्वात सुंदर डोळ्यांना पुरस्कार! सहज काढलेल्या फोटोनं केले मालामाल

googlenewsNext

डोळ्यांत मूर्तिमंत भीती... अश्रूंनी डोळे डबडबलेले... हात जोडलेले... २००२ मध्ये  झालेल्या गुजरात दंगलीचा ‘चेहरा’ बनलेल्या कुतुबुद्दीन अन्सारी यांचा हा फोटो संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला. या दंगलीची भयानकता किती होती, हे सारं काही एका फोटोतूनच लक्षात येत होतं... त्यापुढे एक शब्दही बोलण्याची, सांगण्याची, लिहिण्याची गरज नाही, इतका बोलका हा फोटो...दुसरा फोटो आपल्या हिरव्या डोळ्यांमुळे जगप्रसिद्ध झालेल्या शरबत गुल या बारा वर्षीय अफगाणी मुलीचा. १९८५ मध्ये नॅशनल जिओग्राफिकनं मुखपृष्ठावर हा फोटो प्रसिद्ध केला होता आणि रातोरात शबनम गुल जगभरातील लोकांच्या चर्चेचा विषय झाली. तालिबानी अतिरेक्यांपासून वाचण्यासाठी ती अफगाणिस्तानातून पळाली आणि पाकिस्तानच्या एका शरणार्थी शिबिरात तिनं आश्रय घेतला. पाकिस्ताननंही तिला पुन्हा हाकलून अफगाणिस्तानात पाठवलं. त्यानंतर ही शरबती आँखे अनेक वर्षे जगापासूनच गुल झाली. हे डोळे पुन्हा दिसले ते तब्बल ३० वर्षांनी.

पत्रकारांनी तिला पुन्हा शोधून काढलं आणि तिचा पूर्वीचा व आताचा असे दोन्ही फोटो समोरासमोर ठेवून या डोळ्यांची जादू परत एकदा जगासमोर ठेवली. असे हे डोळे... विसरता येतील कधी?...आता आणखी एका छोट्या मुलीचा फोटो जगाच्या समोर आला आहे. हे डोळेही आहेत हिरवेच, पण हिऱ्यांची चमक या डोळ्यांना आहे... ओमानमधील एका छोट्याशा निरागस मुलीचे हे फोटो आहेत. सहजच म्हणून काढलेल्या या फोटोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं पारितोषिक मिळालं आणि फोटोग्राफर मालामाल झाला. तो फोटो आहेही तसाच अफलातून...

जगभरातील सर्वोत्कृष्ट फोटोसाठी दरवर्षी ‘हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी ॲवॉर्ड’ (एचआयपीए) ही स्पर्धा घेतली जाते. नामांकित फोटोग्राफर्स या स्पर्धेत भाग घेतात. २०११ पासून दुबईचे युवराज शेख हमदान बिन रशीद मोहम्मद अल मक्तुम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी स्पर्धेचं  सूत्र वेगवेगळं असतं. त्यात जगभरातील दिग्गज फोटोग्राफर्स आपलं नशीब अजमावतात. यंदा ओमान येथील फोटोग्राफर तुर्की बिन इब्राहिम अल जुनैबी यानं हा पुरस्कार पटकावला आहे. जुनैबी एकदा सहज म्हणून फिरत असताना त्याला ही चिमुरडी दिसली. तिचेही डोळे शरबत गुलसारखेच हिरवे होते, पण या लहानग्या मुलीच्या डोळ्यांत एक वेगळ्याच प्रकारचं तेज होतं.

उत्सुकता म्हणून या मुलीचे फोटो त्यानं क्लिक केले. योगायोगानं यंदा या स्पर्धेचा विषय ‘डोळे’ (आइज) असाच होता. जुनैबीनं सहज म्हणून काढलेला हा फोटो स्पर्धेसाठी पाठवला. त्यात तो अव्वल ठरला. जगभरात हा फोटो आता व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर जुनैबी यांना एक लाख ५४ हजार रियाल (चार लाख डॉलर्स किंवा सुमारे तीन कोटी रुपये) इतकी रक्कमही पुरस्कार म्हणून मिळाली आहे.
जुनैबी यानं ओमानमधील मेसिराह या बेटावर हा फोटो क्लिक केला आहे. यासंदर्भात जुनैबी सांगतो, अगदी काही क्षणांसाठी ही मुलगी मला दिसली. योगायोगानं माझा कॅमेरा माझ्याजवळ होता. निसर्गातलं असो वा एखाद्या व्यक्तीमधलं, काही वेगळेपण मला दिसलं, की आपोआपच माझा हात माझ्या कॅमेऱ्याकडे जातो. त्या दिवशीही तसंच झालं. या मुलीला पाहताच तिच्या डोळ्यांतील तेजानं मी भारावलो आणि त्याच अवस्थेत मी तिचे काही फोटो काढले. या मुलीचा फोटो इतका व्हायरल होईल आणि मुख्य म्हणजे त्याला जगातला पहिला पुरस्कार मिळेल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्या आयुष्यातला हा सर्वात अभिमानाचा क्षण आहे. ही मुलगी जितकी सुंदर आहे, तितकाच ओमान हा देश. यानिमित्तानं ओमानचं निसर्गसौंदर्यही जगापुढे यावं, अशी माझी इच्छा आहे. जगातील पर्यटकांचा ओढा आता ओमानकडे वाढेल, अशी मला आशा आहे!”

जुनैबी ओमानचा असला, तरी भारताविषयीही त्याला प्रचंड आकर्षण आहे. भारताच्या विविधतेचा, इथल्या निसर्गसौंदर्याचा आणि इथल्या लोकांचाही तो खूप मोठा चाहता आहे. इतक्या जातीधर्माचे आणि पावलागणिक भाषिक बदल असलेले कोट्यवधी लोक एकत्र कसे काय राहतात, याचं त्याला कायम आकर्षण वाटत राहिलं आहे. याच आकर्षणापोटी भारतालाही त्यानं भेट दिली आहे. आपल्या भारत दौऱ्यात विविध फोटो त्यानं काढले आहेत. विशेषत: वाराणसी (बनारस) येथील वैविध्याचे अनेक फोटो त्यानं टिपले आहेत आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही ते शेअर केले आहेत. त्यांनाही रसिकांची तितकीच दाद मिळते आहे.

जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार !
जगभरात फोटोग्राफीच्या ज्या स्पर्धा घेतल्या जातात, त्यात अंतरराष्ट्रीय स्तरावर ‘हमदान इंटरनॅशनल फोटोग्राफी ॲवॉर्ड’ (एचआयपीए) ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार दिला जाणारी ही स्पर्धा त्यामुळेच नावाजलेली आहे. जगभरातून ज्या हजारो स्पर्धकांनी आपले फोटो पाठवले होते, त्यातून केवळ ३६ फोटो निवडले गेले आणि केवळ पाच उत्तम फोटोंना बक्षीस देण्यात आलं. त्यात जुनैबीच्या ‘गर्ल विथ ग्रीन आइज’ला सर्वोत्तम पुरस्कार दिला गेला. ‘आँखे तेरी शबनमी, चेहरा तेरा आईना..’ हेच खरं.

Web Title: Award for the most beautiful eyes in the world! Photo of an innocent little girl from Oman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.