अजब गजब ! एक हॉटेल जिथे माकडं करतात वेटरचं काम
By शिवराज यादव | Published: August 10, 2017 03:33 PM2017-08-10T15:33:27+5:302017-08-10T15:37:51+5:30
विश्वास बसणार नाही पण जपानमध्ये असं एक हॉटेल आहे जिथे माकड चक्क वेटर म्हणून काम करतं. या हॉटेलमधील सर्व कामं हा माकड करतो.
टोकियो, दि. 10 - माकड म्हटलं किंवा दिसला तरी अनेकजण किळसवाणा चेहरा करतात. म्हणजे खोड्या काढायचं सोडून माकड दुसरं काही करु शकतो असं विचारलं तर अनेकजण नाही असंच म्हणतील. कोणी माकड असा उल्लेख जरी केला तरी डोक्यात एक प्रतिमा तयार होते. आपले पुर्वज म्हणून उल्लेख ज्याचा होतो तो हाच माकड जर का एखाद्या हॉटेलमध्ये दिसला तर...आणि तेदेखील वेटरच्या वेशात, तर किती आश्चर्य वाटेल. विश्वास बसणार नाही पण जपानमध्ये असं एक हॉटेल आहे जिथे माकड चक्क वेटर म्हणून काम करतं. या हॉटेलमधील सर्व कामं हा माकड करतो.
माकड एखाद्या घरात किंवा हॉटेलमध्ये शिरला तर वस्तू चोरी होण्यापासून ते नासधूस होईपर्यंत सगळं काही शक्य असतं. पण जे अशक्य आहे तेदेखील माकड करताना जपानमधील हॉटेलमध्ये दिसत आहे. एरव्ही हातातल्या गोष्टी घेऊन पळून जाताना दिसणार माकड या हॉटेलमध्ये मात्र ग्राहकांना त्यांचं जेवण टेबलावर आणून देताना दिसतं.
हे माकड ग्राहकांची ऑर्डरदेखील घेत, आणि जेवण वाढण्याचं कामही अत्यंच चोख रितीने करतं. एखाद्या सामान्य वेटरप्रमाणे त्यालादेखील युनिफॉर्म देण्यात आला आहे.
आपल्या या अनोख्या वेटरमुळे हे रेस्टॉरंट फक्त जपानच नाही तर जगभरात प्रसिद्ध झालं आहे. अनेकदा लोक फक्त या वेटर माकडाला पाहण्यासाठी म्हणून येत असतात. एका माकडाला वेटर म्हणून काम देण्याचं कसं काय सुचलं असा प्रश्न हॉटेल मालकाला विचारला असता त्याने सांगितलं की, 'या माकडाला मी पाळत होतो. जेव्हा तो माझी नकल करत असल्याचं पाहिलं तेव्हाच माझ्या डोक्यात हा विचार आला'.
आपल्या या पाळीव माकडाचं काम पाहून हॉटेल मालकाने ही गोष्ट प्रसिद्धीसाठी वापरण्याचा विचार केला, आणि तसं झालंही. पण या मुक्या प्राण्याला दिवसभर राबवलं जात नाही. जपानमधील कायद्यानुसार, जनावरांना दोन तासापेक्षा जास्त वेळ काम करायला लावू शकत नाही. त्यामुळे हे माकड दिवसातून फक्त दोन तास हॉटेलमध्ये वेटर म्हणून वावरताना दिसतं. हॉटेलमध्ये त्याच्याशिवाय अजूनही काही माकडांना वेटरचं काम देण्यात आलं आहे.
हॉटेलमध्ये येणा-या ग्राहकांनाही माकडाचं कौतुक वाटतं. अत्यंत सहजपणे त्याला आम्ही दिलेली ऑर्डर समजते. इतकंच नाही तर जी ऑर्डर दिली आहे, नेमक्या त्याच गोष्टी तो आणतो. या माकडांना टेबल क्रमांकही व्यवस्थित लक्षात राहतो. तसं पाहायला गेलं तर यामुळे एकाप्रकारे माकडांना रोजगार मिळण्याची संधीच उपलब्ध झाली आहे.