महाराष्ट्रातून लाकूड, गुजरातमधून सिंहासन; राम मंदिरासाठी कोणत्या राज्यातून काय आलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:40 PM2024-01-22T14:40:02+5:302024-01-22T14:40:48+5:30
अयोध्यातील राम मंदिरासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळं योगदान दिलं गेलं आहे.
अयोध्याच्या राम मंदिरात आज रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. याचा देशभरात जल्लोष केला जात आहे. राम मंदिराबाबत केवळ देशातच नाहीतर परदेशातही फार उत्साह सुरू आहे. रामभक्तांचं मत आहे की, 500 वर्षांचा वनवास संपला आहे. अयोध्यातील राम मंदिरासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळं योगदान दिलं जात आहे.
राज्यांनी ज्या पद्धतीने योगदान दिलं त्याचा लेखाजोखा समोर आला आहे. राम मंदिर निर्माणासाठी राजस्थानच्या नागौरमधील मकरानाचा वापर झाला. मकरानाच्या मार्बलमधूनच राम मंदिराच्या गर्भगृहातील सिंहासन बनवण्यात आलं आहे. भगवान श्रीरामांच्या सिंहासनावर सोन्याचा थर लावण्यात आला आहे. गर्भगृह आणि फरशीवर मकरानातील पांढरं मार्बल आहे. मंदिराच्या पिलरला बनवण्यात मकरानातील मार्बलचा वापर झाला आहे.
मंदिरातील देवतांची कलाकृती कर्नाटकातील चर्मोथी दगडांवर करण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवेश द्वारावरील भव्य कलाकृतींसाठी राजस्थानच्या बंही पहाडपूरच्या गुलाबी बलुआ दगडांचा वापर करण्यात आला आहे. गुजरातकडून 2100 किलोची अष्टधातुंची घंटा देण्यात आली आहे.
गुजरातच्या अखिल भारतीय दरबार समाजाद्वारे 700 किलोचा रथ भेट देण्यात आला आहे. भगवान रामाची मूर्ती बनवण्यासाठी काळा दगड कर्नाटकातून आला आहे. अरूणाचल प्रदेश आणि त्रिपुरातील नक्षीदार लाकडाचे दरवाजे आणि हातांनी तयार केलेले कापड आले आहेत.
तसेच पितळ्याची भांडी उत्तर प्रदेशातून आली आणि पॉलिश केलेलं सागवान लाकूड महाराष्ट्रातून आलं आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वीट साधारण 5 लाख गावाहून आल्या आहेत.