Citizenship Rule ३६ हजार फूट उंचीवर विमानात झाला बाळाचा जन्म, पण आता नागरिकत्वावरून गोंधळ, जाणून घ्या पुढे काय झालं...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 09:34 PM2022-11-07T21:34:46+5:302022-11-07T21:37:00+5:30
बाळाला घेऊन माता दुतावासात पोहोचली, त्यानंतर तिला एक नियम समजला.
Weird News, Citizenship Rule: कल्पना करा जर एखादी गर्भवती महिला ३६,००० फूट उंचीवर विमानात प्रवास करत असेल आणि तिला अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या, तर विमानात जन्मलेल्या मुलाला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळेल? तुम्हीही गोंधळून गेलात ना... पण अशीच एक घटना अमेरिकेतील एका महिलेसोबत घडली आणि तिला अशाच गोंधळाला सामोरे जावे लागले. मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे विमानातील अधिकाऱ्यांनी बाळाच्या नागरिकत्वाची योग्य माहिती दिल्याने साऱ्यांच्या जीवात जीव आला.
२१ वर्षीय गर्भवती महिलेने विमानामध्ये प्रवास केला-
रिपोर्टनुसार, अमेरिकेतील कनेक्टिकट प्रांतात राहणारी २१ वर्षीय कांड्रिया रोडेन ३२ आठवड्यांची गर्भवती होती. तिच्या प्रसूतीच्या तारखेला एक महिना बाकी होता. म्हणूनच ती आपल्या बहिणीसोबत अमेरिकेतून डोमिनिकन रिपब्लिक देशात जात होती. फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापूर्वी, केंड्रा रोडेन यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि त्यांच्या संमतीनंतरच ती फ्लाइटमध्ये बसण्यास तयार झाली होती.
३६ हजार फूट उंचीवर बाळाला जन्म दिला-
३६ हजार फूट उंचीवर जेव्हा विमान उडत होते, तेव्हा तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. तिची बहीण आणि केबिन क्रू तिला विमानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेले, जिथे तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. केंड्राने या बाळाचे नाव 'स्कायलेन' ठेवले आहे. डॉमिनिकन रिपब्लिक देशात पोहोचल्यावर, तिला आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ती ४ दिवसांसाठी दाखल झाली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती डोमिनिकन रिपब्लिकमधील अमेरिकन दूतावासात पोहोचली.
बाळाच्या नागरिकत्वावरून गोंधळ
आपल्या मुलाचे नागरिकत्व काय असेल, या संभ्रमात केंड्रा होती. त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळू शकेल की ते नाकारले जाईल, असा प्रश्न तिला पडला होता. मुलाच्या जन्माची कहाणी जाणून घेतल्यानंतर, दूतावासातील कर्मचार्यांनी दिलेले उत्तर जाणून केंड्राला आनंद झाला. कर्मचार्यांनी तिला सांगितले की, USA Citizenship Ruleनुसार, जर एखाद्या अमेरिकन महिलेने फ्लाइटमध्ये असताना मुलाला जन्म दिला, तर बाळाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते. जरी महिला कोणत्याही देशातील विमानात असली तरीही नियम तोच असतो. त्यामुळे केंड्राला दिलासा मिळाला.