जगातील सर्वात लांब काचेचा पूल, इथं जाणं एखाद्या अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 04:44 PM2024-02-28T16:44:41+5:302024-02-28T16:45:28+5:30
Bach Long Bridge : जगभरातील पर्यटकांना आकर्षित कराणार हा पूल आहे.
Bach Long Bridge : जगभरात अनेक पूल आहेत. या पुलांवर बऱ्याच जणांना फिरायला आवडते, तर असे काही पूल आहेत. जिथे लोक जायला घाबरतात. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या काचेच्या पुलाबद्दल सांगणार आहोत. व्हिएतनाममध्ये असलेला बॅक लाँग ब्रिज हा जगातील सर्वात लांब काचेचा पूल असल्याचे म्हटले जाते. जगभरातील पर्यटकांना आकर्षित कराणार हा पूल आहे. या पुलाचे खास वैशिष्ट्य काय आहे? त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या....
हा पूल किती मोठा आहे?
व्हिएतनाममध्ये असलेला बॅक लाँग ब्रिज हा सर्वात लांब काचेचा पूल असल्याचे म्हटले जाते. त्याला इंग्रजीत 'व्हाइट ड्रॅगन' असेही म्हणतात. दरम्यान, अनेकांना उंचीची भीती वाटते, अशा लोकांसाठी या पुलावर जाणे एखाद्या अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूल काचेने तयार केला आहे. अशा परिस्थितीत पायाखाली बघूनही त्यावरून चालणारे लोक घाबरतात. हा पूल 632 मीटर लांब म्हणजेच सुमारे 2,073 फूट आहे आणि त्याची उंची 150 मीटर म्हणजे 492 फूट आहे. या पुलाचा मजला फ्रेंच उत्पादकांनी बनवलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या टेम्पर्ड काचेपासून बनवण्यात आला आहे, जो इतका मजबूत आहे की, या काचेच्या पुलावर एकावेळी 450 लोक आरामात चालू शकतात.
जगात काचेचे पूल कुठे आहेत?
चीनच्या ग्वांगडोंगमध्ये 526 मीटर लांबीचा काचेचा तळाचा पूल (ग्लास बॉटम ब्रिज) आहे. याशिवाय पोर्तुगालमध्ये 1600 फूट काचेच्या तळाचा पूलही पूर्ण झाला आहे. भारतातील बिहार राज्यातील राजगीरमध्येही काचेचा पूल आहे. दरम्यान, हे काचेचे पूल पर्यटकांना खूप आकर्षित करतात. इतर अनेक देशांमध्ये काचेचे पूल आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका पर्यटकाने राजगीर पुलाला भेट दिल्याचा अनुभव सांगितला. या पर्यटकाने सांगितले की, काचेच्या पुलावरून चालताना थोडी भीती वाटते, कारण पायाखाली सर्व काही स्पष्ट दिसते. पण काचेमुळे आपण नैसर्गिक सौंदर्य देखील पाहू शकतो. कुटुंबाला अशी जागा खूप आवडते, असे त्यांनी सांगितले.