बजरंगी भाईजान फेम पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाबला पोलिसांचा चोप
By admin | Published: September 22, 2015 05:15 PM2015-09-22T17:15:26+5:302015-09-22T17:19:07+5:30
बजरंगी भाईजान फेम पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब पुन्हा एकदा चर्चेत आला असून कराची रेल्वे स्टेशनवर वृत्तांकनासाठी गेलेल्या चांद व त्याच्या सहका-यांना रेल्वे पोलिसांनी चोप दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २२ - बजरंगी भाईजान फेम पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब पुन्हा एकदा चर्चेत आला असून कराची रेल्वे स्टेशनवर वृत्तांकनासाठी गेलेल्या चांद व त्याच्या सहका-यांना रेल्वे पोलिसांनी चोप दिला आहे. पोलिस व चांद यांच्यात नेमका वाद कशावरुन झाला हे अद्याप समजू शकले नसून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील चॅनल ९२ या वृत्तवाहिनीत काम करणारा चांद नवाब व त्याचे सहकारी कराची रेल्वे स्थानकावर वृत्तांकनासाठी गेले होते. तिकीटांच्या काळाबाजाराविषयी माहिती घेत असताना रेल्वे पोलिस व कर्मचा-यांनी चांदवर मारहाण केली. मारहाणीची घटना कॅमे-यात कैद झाली असून चॅनल ९२ ने या मारहाणीसंदर्भात सिंध प्रांतातील मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.मारहाण नेमकी कशामुळे झाली, यात चांदची काय चुक होती हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला होता. कराची रेल्वे स्टेशन ईदची बातमी देत असताना चांदने तब्बल २० वेळा रिटेक घेतला होता. चांदचा हा व्हिडीओ चेष्टेचा विषय ठरला होता. यानंतर बजरंगी भाईजान या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकीने साकारलेली पत्रकाराची भूमिका ही चांद नवाबवर आधारित होती. या चित्रपटामुळे चांद पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला होता. ज्या कराची रेल्वे स्थानकामुळे चांद प्रसिद्ध झाला त्याच स्थानकावर त्याला मारहाण करण्यात आली.