जा, प्रभू रामांचं आधार कार्ड घेऊन या; सरकारी धान्य खरेदी केंद्रावर पुजाऱ्यासोबत घडला अजब प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:09 PM2021-06-10T17:09:28+5:302021-06-10T17:09:57+5:30
धान्याची विक्री करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांचं आधार कार्ड आणण्यास सांगितलं
बांदा: प्रभू रामाची नगरी असलेल्या उत्तर प्रदेशात एक अजब प्रकार घडला आहे. बांदा जिल्ह्यातील राम जानकी मंदिराच्या एका पुजाऱ्याकडे प्रशासनानं प्रभू श्रीरामाचं आधार कार्ड मागितलं आहे. मंदिर परिसरात पिकवलेलं धान्य विकत घेताना अतर्राचे एसडीएम सौरभ शुक्ला यांनी प्रभू रामचंद्रांचं आधार कार्ड मागितल्याचा आरोप पुजाऱ्यानं केला आहे. धान्य विकायचं असल्यास श्रीरामांचं आधार कार्ड घेऊन या, असं शुक्ला यांनी सांगितल्याचा आरोप पुजारी रामकुमार दास यांनी केला आहे.
अतर्रा तहसीलमध्ये येत असलेल्या खुरवंड गावातील काही जमीन राम जानकी मंदिराच्या ताब्यात आहे. मंदिराचे पुजारी रामकुमार दास या जमिनीची देखभाल करतात. या जमिनीवर ते शेती करतात आणि येणारं पीक विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मंदिराचा खर्च चालवतात. मात्र आता मंदिराच्या मालकीची जमिनीवर पिकणारं धान्य विकायचं कसं या चिंतेत रामकुमार दास आहेत. कारण अतर्राचे एसडीएम सौरभ शुक्ला यांनी त्यांच्याकडे शेताचे मालक म्हणजेच श्रीरामाच्या हाताचे ठसे घेऊन येण्यास सांगितलं आहे.
या प्रकरणी विचारणा करताच अतर्राचे एसडीएम (उपजिल्हाधिकारी) सौरभ शुक्ला यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'सरकारनं ठरवलेली प्रक्रियेचा संदर्भ देऊन मी धान्य खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली होती. देवाचं आधार कार्ड आणण्याचा विषय कुठून आला याची माहिती पुजारीच सांगू शकतात,' असं शुक्ला म्हणाले. आधार कार्ड घेऊन या, असं मी कदाचित म्हटलं असेल. पण ते कोणत्या तरी वेगळ्या संदर्भात म्हटलं असेल, अशी सारवासारव शुक्ला यांनी केली.