बी अ गुड बॉय! मुलाखतकार घाबरल्याचं पाहून Ratan Tata यांनी श्वानाला प्रेमानं समजावलं; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 03:01 PM2022-02-09T15:01:50+5:302022-02-09T15:02:13+5:30
उद्योजक आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आणि नि:स्वार्थ कार्यामुळे ओळखले जातात. ...
उद्योजक आणि टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे आपल्या प्रेमळ स्वभावामुळे आणि नि:स्वार्थ कार्यामुळे ओळखले जातात. रतन टाटा हे श्वानप्रेमी आहेत हे एक उघड गुपितच आहे. लोकोपयोगी कार्य आणि त्यांच्या दयाळूपणाबाबत ते परिचित आहेतच. टाटा समुहाचं (TATA Group) मुंबईत जागतिक मुख्यालय आहे. पण तुम्हाला माहितीये का या जागतिक मुख्यालयात भटक्या श्वानांसाठीही घर बांधण्यात आलंय?
याच भटक्या श्वानांमध्ये गोवा नावाचाही एक श्वान आहे. जेव्हा रतन टाटा या कार्यालयात मीटिंगसाठी येतात तेव्हा 'गोवा' देखील त्यांच्यासोबत कार्यालयात उपस्थित असतो. परंतु तुम्हाला माहितीये 'गोवा' अन्य लोकांसोबत आणि विशेषत: ज्यांना श्वानांची भीती वाटते त्यांच्यासोबत कसा असतो? टाटांच्या कार्यालयात गेलेल्या मुलाखतकारनं आपल्याला आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा मेहता यांनी लिंक्डइन (LinkedIn) वर यासंदर्भात एक स्टोरी शेअर केली आहे.
झालं असं की मुलाखत घेणाऱ्या महिलेला श्वानांची भीती वाटत होती. परंतु रतन टाटा यांची भेट आणि मुलाखत घेण्यासाठी त्यांनी मोठी वाटही पाहिली होती. त्यामुळेच आपण श्वानांना थोडं भीतो या त्या उघडपणे टाटांना सांगू शकल्या नाहीत. परंतु जेव्हा त्यांनी टाटांचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या टाटांनी ती गोष्ट ऐकली आणि त्यांना तुम्ही ठीक आहात ना अशी विचारणाही केली.
... तेव्हा टाटांनी 'गोवा'ला प्रेमानं समाजवलं
जेव्हा नायडू यांनी टाटांना मुलाखतकार श्वानांना थोड्या घाबरत असल्याचं सांगितलं, तेव्हा टाटांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलं आणि ते 'गोवा' या श्वानाला समजावण्यासाठी त्याच्याकडे गेले. "गोवा त्यांना तुझी भीती वाटतेय, बी अ गुड बॉय," असं टाटांनी त्याला समजावून सांगितलं आणि त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी येण्याची विनंती केली.
"मी तब्बल ३०-४० मिनिटं त्या ठिकाणी होते. परंतु गोवा माझ्याजवळ बिलकुल आला नाही. यामुळे मी खरंच चकित झाले, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं," असं मेहता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यानंतर टाटांनी खुलासा करत 'गोवा' हा एक भटका श्वान आहे आणि त्याला दत्तक घेतलं असल्याचं टाटांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलंय.